कोल्हापूर : नवरात्रौत्सवात रस्ते पूर्णत: बंद नाहीत | पुढारी

कोल्हापूर : नवरात्रौत्सवात रस्ते पूर्णत: बंद नाहीत

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नवरात्रौत्सवात अंबाबाई मंदिर परिसरातील रस्ते पूर्णपणे बंद करणार नाही, असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाला दिले. यासंदर्भात बुधवारी सकाळी 11 वाजता दुचाकी व रिक्षा वाहतूक सुरू करण्याच्या द़ृष्टीने पोलिस अधीक्षकांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करू, असेही ते म्हणाले.

नवरात्रौत्सवात दररोज लाखो भाविक अंबाबाई दर्शनासाठी येत असतात. गेल्या काही वर्षांत महाद्वार रोड, जोतिबा रोड, भाऊसिंगजी रोड, गुजरी, भेंडे गल्ली, ताराबाई रोड, राजोपाध्ये बोळ हे सर्व रस्ते बॅरिकेडस् लावून बंद केले जातात. त्यामुळे या परिसरात भाविकांना येण्यासाठी अडचणी येतात.

यावर्षी निर्बंधमुक्त उत्सवामुळे व्यावसायिकांनीही अधिक व्यवसाय होण्याच्या द़ृष्टीने तयारी केली आहे. परंतु, जर रस्ते बंदच राहिले; तर पुन्हा एकदा व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागेल व व्यापाराला मोठा फटका बसेल. त्यामुळे यावर्षी रस्ते पूर्ण बंद करू नयेत, अशी मागणी व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने केली.

यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी रस्ते पूर्ण बंद न करता किमान दुचाकी व रिक्षा वाहतूक सुरू होण्याच्या द़ृष्टीने नियोजन करू आणि त्यासाठी पोलिस अधीक्षकांसोबत संयुक्त फिरती करू, असे आश्वासन दिले. यावेळी सराफ असोसिएशन येथे व्यापार्‍यांसोबत चर्चा करून या रस्त्यांची पाहणी करणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, विजय जाधव, अशोक देसाई, अजित ठाणेकर, महाद्वार व्यापारी असो.चे अध्यक्ष किरण नकाते, सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, प्रीतम ओसवाल, जयंतभाई गोयानी, मनोज बहिरशेट, बन्सी चिपडे उपस्थित होते.

Back to top button