परिक्रमा यात्रा : पोलिस आंदोलकांमध्ये बाचाबाची, हेरवाडमध्‍ये तणाव | पुढारी

परिक्रमा यात्रा : पोलिस आंदोलकांमध्ये बाचाबाची, हेरवाडमध्‍ये तणाव

कुरुंदवाड ; पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी परिक्रमा यात्रा काढण्यात आली आहे. नृसिहवाडी येथे होणाऱ्या जलसमाधीसाठी अब्दुललाट येथून निघणाऱ्या शेतकऱ्यांची वाहने  पोलिसांनी हेरवाड येथे अडवली. यावेळी परिक्रमा यात्रा मध्ये सहभागी झालेले आंदोलक आणि पोलिसांमध्‍ये बाचाबाची झाली. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल शहाजी फोंडे यांच्याशी संघटनेचे सावकर मदनाईक यांनी आंदोलकांना सोडून वाहने परत फिरणार असल्याचे सांगितले. यानंतर पोलीस कॉन्स्टेबल फोंडे यांनी सपोनि बालाजी भांगे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. वाहने परत घेऊन येण्याच्या अटीवर वाहने पुढे सोडण्यात आली.

वाहने पाेलिसांनी अडवली

पट्टणकडोली येथून वस्ती करून शनिवारी संध्याकाळी अब्दुललाट येथे वस्तीला आलेल्या स्वाभिमानीची जलसमाधी परिक्रमा यात्रा आज (रविवार) सकाळी हेरवाडकडे निघाली आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी निघालेली वाहने पोलिसांनी हेरवाड चौकात अडवली. वाहने पुढे सोडणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली असता, पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्याच्यात बाचाबाची झाली.

वाहने यात्रेच्या समोर गेल्यास वाहतूक विस्कळीत होऊन यात्रेत अडचण निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी वाहने सोडत नसल्याचे पाेलिसांनी सांगितले. पोलिसांनी समजूत काढताच आंदोलक शांत झाले. स्वाभिमानीचे मदनाईक यांनी आम्ही आंदोलकांना यात्रेच्या काही अंतरावर सोडून वाहने परत फिरवू असे सांगितले. पोलीस कॉन्स्टेबल फोंडे यांनी सपोनि भांगे यांच्याशी संपर्क साधून वाहने सोडण्यास परवानगी दिली. यामुळे हेरवाडात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

हेही वाचलं का ? 

 

  • पाहा व्‍हिडिओ : मुलगी क्रिकेट खेळणार म्हणून चिडवले : पण उंचावले तिने नाव कोल्हापूरचे

Back to top button