

लंडन : हृदयविकारासाठीचे सर्वात मोठे कारण असते रक्तवाहिन्यांमध्ये साठलेले 'बॅड कोलेस्टेरॉल'. ते घटवण्यासाठी आता वारंवार स्टेटिन्स औषध घेण्याची गरज भासणार नाही. बि—टनमध्ये असे कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी लस तयार करण्यात आली असून ही लस वर्षातून दोनवेळा घेतल्यास कोलेस्टेरॉल हटू शकते असा संशोधकांचा दावा आहे. ही लस आता तिथे रुग्णांसाठी उपलब्धही करण्यात आली आहे.
या लसीला 'इक्लिसिरेन' असे नाव देण्यात आले आहे. बि—टनमधील आरोग्य संस्था 'एनएचएस'ने बुधवारी या लसीची सुरुवातही केली आहे. हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोलेस्टेरॉल हा एक चरबीयुक्त चिकट पदार्थ असतो. तो रक्तवाहिन्यांच्या भिंतींजवळ साचून राहतो व त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाहाचा मार्ग संकुचित होत जातो. त्यामुळे हार्टअॅटॅक, स्ट्रोक आणि धमन्यांची हानी होण्याचे धोके वाढतात. त्याला वैज्ञानिक भाषेत 'एलडीएल कोलेस्टेरॉल' असे म्हटले जाते.
हे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी किंवा हटवण्यासाठी आता ही नवी लस तयार करण्यात आली आहे. सहा महिन्यांमधून एकदा अशी वर्षातून दोनवेळा ही लस घ्यावी लागेल. त्यामुळे रुग्णाच्या शरीरातील 50 टक्के कोलेस्टेरॉल घटू शकते. बि—टनमधील आरोग्य सचिव साजिद जावेद यांनी म्हटले आहे की ही जीवनरक्षक उपचारपद्धती आहे. त्यामुळे हृदयविकार वाढण्यास आळा बसेल. कोलेस्टेरॉलचे हे नवे औषध 'स्टेटिन्स'च्या तुलनेत अधिक प्रभावी आहे. जे लोक काही कारणांमुळे औषध घेऊ शकत नाहीत, त्यांनाही ही लस घेता येऊ शकेल.
हे औषध 'पीसीएसके 9' नावाच्या प्रोटिनला ब्लॉक करून कोलेस्टेरॉल हटवण्यासाठी यकृताला मदत करते. या प्रोटिनमुळेच शरीरातील अवयव कोलेस्टेरॉल हटवू शकत नाहीत. नवे औषध याच प्रोटिनला ब्लॉक करते. जसे जसे कोलेस्टेरॉलचा स्तर कमी होईल तसा आजाराचा धोकाही घटेल. बि—टनमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात या इंजेक्शनसाठी तीन लाख रुग्णांना अनुमती देण्यात आली आहे. या लोकांमध्ये कोलेस्टेरॉलचे अधिक प्रमाण असणार्या तसेच हृदयविकार, हार्टअॅटॅक किंवा स्ट्रोकशी झुंजणार्या लोकांचा समावेश आहे.