शैक्षणिक धोरणाबाबत लवकरच बैठक : शिक्षणमंत्री दीपक केसरकर | पुढारी

शैक्षणिक धोरणाबाबत लवकरच बैठक : शिक्षणमंत्री दीपक केसरकर

उजळाईवाडी ; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी राज्यातील शिक्षणतज्ज्ञांची बैठक सिद्धगिरी मठावर लवकरच घेऊ, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अद़ृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांना दिली. केसरकर यांनी शनिवारी सिद्धगिरी मठाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

ना. केसरकर म्हणाले, अद़ृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी सिद्धगिरी मठाच्या माध्यमातून विद्या चेतना हा उपक्रम जिल्हात जिल्हा परिषद शाळेअंतर्गत राबवला जातो. यामध्ये विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चाचणी तसेच त्यांना शैक्षणिक पाठ्यक्रम अभ्यास घेतला जातो. अनेक दुर्गम भागांमध्ये शाळेला शिक्षक मिळत नाहीत. जर मिळाले तर अनेक कारणाने रजा, सुट्ट्या घेतात. त्यामुळे या दुर्गम भागातील विद्यार्थी शैक्षणिकद़ृष्ट्या मागास राहतात. त्यामुळे याचाही विचार करणे गरजेचे आहे. येणार्‍या काळात विद्या चेतनाच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकाबरोबरच विद्यार्थ्याचा कृषी, औद्योगिक, पर्यावरण अशा विविध अंगाने विकास व्हावा यासाठी त्या विषयातील गावातील तज्ज्ञ यांची शिक्षक म्हणून निवड करून योजना जिल्हाभर राबवण्याचा मानस आहे. यावेळी उद्योजक मदन कुलकर्णी, यशोवर्धन बारामतीकर, जी. पी. वड्ड, अ‍ॅड. एम. डी. पाटील, सहसंचालक सुभाष चौगले, गटशिक्षणाधिकारी सरनाईक, उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे आदी उपस्थित होते.

शाळांना भेटी

दरम्यान, केसरकर यांनी शनिवारी कणेरीवाडी प्राथमिक शाळा, कणेरी येथील काडसिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी काही प्रश्न विचारले. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे देऊन काहींनी डॉक्टर काहींनी इंजिनिअर होणार असल्याचे सांगितले यावेळी अ‍ॅड. एम. डी. पाटील, प्राचार्य अर्जुन होनगेकर, सुरेश पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

अद्याप गृहपाठवर फक्त चर्चा

गृहपाठ बंद करण्यासाठी फक्त चर्चा सुरू आहे. अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती केसरकर यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली. गृहपाठ बंद करण्यावरून राज्यात अनेक शिक्षक संघटना तसेच पालकांत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून गृहपाठ बंद करण्याच्या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध होत आहे. यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, अद्याप गृहपाठ बंद केलेला नाही. फक्त त्यावर चर्चा सुरू आहे. जर पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पास करण्याचे धोरण अवलंबले असेल तर दररोज त्यांना गृहपाठ देऊन त्यांची चाचणी का घेतली जाते हाही प्रश्न उपस्थित होतो. येत्या काही दिवसांत यासंदर्भात सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

Back to top button