कोल्हापूर: अंबाईवाडा येथील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी २१ किलोमीटरची पायपीट | पुढारी

कोल्हापूर: अंबाईवाडा येथील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी २१ किलोमीटरची पायपीट

शित्तूर-वारूण : सतीश नांगरे: शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील डोंगर-कपारीत उखळूपैकी अंबाई धनगरवाडा वसलेला आहे. येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना वाहतूक साधनांच्या अभावामुळे शिक्षणासाठी रोज तब्बल २१ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ज्ञानार्जनासाठी आजही येथील विद्यार्थ्यांना रोज चार तास पायी चालावे लागते. ही शोकांतिका आहे.

उखळू या गावापासून आठ किलोमीटर अंतरावर अंबाईचा धनगरवाडा आहे. सभोवार घनदाट जंगल अन् आजूबाजूला चोवीस तास वन्यप्राण्यांची धास्ती, सोबतीला अठराविश्व दारिद्र्य. अशा बिकट अवस्थेत आयुष्य जगणाऱ्या येथील धनगर समाज बांधवांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाची वाटही तितकीच खडतर आहे. या धनगर वाड्यावर पहिली ते पाचवीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, पाचवीनंतरच्या शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना शिराळा तालुक्यातील वारणावती व हुतात्मानगर येथील विद्यालयामध्ये जावे लागते. या शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ३२ च्या दरम्यान आहे.

अंबाईवाड्यापासून या विद्यालयांपर्यंतचे अंतर दहा ते अकरा किलोमीटर आहे. येण्या-जाण्याचे एकूण अंतर एकवीस ते बावीस किलोमीटर होते. रोज चार तासाच्या पायपीटीनंतर या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा त्या दिवसाचा संघर्ष संपतो. उखळूपासून अंबाईवाड्यापर्यंतचा रस्ता हा उभ्या डोंगरात व शेवटपर्यंत नागमोडी वळणाचा आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अथक प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री सडक योजनेतून या स्त्याच्या डांबरीकरणाचे काम झाले आहे. मात्र, या रस्त्यावरून शाळेसाठी चालत जाणाऱ्या मुला-मुलींच्या मनात रोज एकच प्रश्न निर्माण होतो. रस्ता झाला, ‘वाहतुकीच्या साधनांचे काय?

मुलींच्या शिक्षणाला गती देण्यासाठी बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत प्रवासाचे पास दिले जातात. त्यामुळे राज्यातील कित्येक मुली शिक्षणाच्या प्रवाहात आहेत. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली, तरी अजूनही महामंडळाची लालपरी या अंबाईवाड्यापर्यंत पोहोचलीच नाही. ती पोहचावी. व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी. यासाठी या तालुक्याचं नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी कोणतेच प्रयत्न करत नाहीत. यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते असेल?

दहाच्या शाळेसाठी आम्हांला घरातून रोज सकाळी आठ वाजता निघावे लागते. सकाळी दोन व शाळा सुटल्यानंतर दोन असे चार तास आम्हांला शाळेसाठी चालावे लागते.

– रोशन व्हडे, विद्यार्थी

हेही वाचलंत का ? 

Back to top button