Video : कन्हैया लाल हत्याकांडावरील ‘ते’ ‘रॅप’ तुफान व्हायरल, रॅपर EPR ची सोशल मीडियावर चर्चा | पुढारी

Video : कन्हैया लाल हत्याकांडावरील ‘ते’ ‘रॅप’ तुफान व्हायरल, रॅपर EPR ची सोशल मीडियावर चर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भारतातील सामाजिक वातावरण तापले. अनेक ठिकाणी शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले. पण हा निषेध नोंदवताना अंदोलकर्त्यांनी एक विशिष्ट घोषणाबाजी केली. हैदराबादमध्येही भाजपचे निलंबित खासदार टी राजा सिंह यांच्या विरोधात अशी घोषणाबाजी करण्यात आली. ‘गुस्ताख-ए-रसूल की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा’। अशी ती घोषणाबाजी होती. राजस्थानच्या उदयपूरमध्ये नुपूर शर्मा यांना पाठिंबा देणाऱ्या टेलर कन्हैयालालची हत्या असूदे किंवा महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे खून प्रकरण असुदे, या सर्व घटनांमागे या घोषणेचा संबंध असल्याची चर्चा आहे. आता पुन्हा एकदा ती घोषणा चर्चेत आली आहे, पण यावेळचे कारण वेगळे आहे. नेमके हे प्रकरण काय ते जाणून घेऊया…

कोलकाता येथील लोकप्रिय रॅपर संथनम श्रीनिवासन अय्यर उर्फ ईपीआर याने धार्मिक अतिरेकावर एक नवीन ट्रॅक तयार केला आहे, जो वादग्रस्त ‘सर तन से जुदा’ घोषणेशी संबधीत आहे. कन्हैया लाल हत्याकांडाचा संदर्भ देत धार्मिक अतिरेकावर प्रकाश टाकणारे रॅपर ईपीआरचे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. रॅपर EPR ने MTV Hustle 2.0 या शोमध्ये हे गाणे गायले आहे. उदयपूरमधील कन्हैया लालच्या निर्घृण हत्येचा संदर्भ देत गायकाने ‘धार्मिक दहशतवादा’च्या नावाखाली निरपराध लोकांची कशी हत्या केली जात आहे, याकडे लक्ष वेधले आहे. रॅपर EPR ने त्याच्या या गाण्यात संपूर्ण हत्याकांडाची घटना सांगितली आहे. दोन लोक कपडे शिवण्याच्या टेलर कन्हैयालालच्या दुकानात कसे घुसतात आणि त्याची हत्या करतात हा सगळा घटनाक्रम EPR त्याच्या रॅपरमधून प्रेक्षकांसमोर मांडतो.

‘सर तन से जुडा’ या घोषणेचा पुढे उल्लेख करताना रॅपर EPR धर्माच्या नावाखाली ही मानवतेची हत्या असल्याचे कळवळून सांगतो. या गाण्याच्या व्हिडिओवर कन्हैया लाल साहूचा मोठा मुलगा यश साहू याने प्रत्क्रिया दिली आहे. ‘ईपीआर ज्या प्रकारे माझ्या वडिलांची निर्घृण हत्या झाली, त्यामुळे आमचे कुटुंब अजूनही या धक्क्यातून बाहेर येऊ शकलेले नाही. गुन्हेगारांना अजून शिक्षा झालेली नाही. सरकारने कठोर निर्णय घ्यावेत. या गुन्हेगारांना लवकरच शिक्षा होईल आशा आहे’, अशी भावना त्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, नेटकरी हे रॅप मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत आणि प्रत्येकाला गायक तसेच गाणे लोकप्रिय करण्याचे आवाहन करत आहेत.

Back to top button