कोल्हापूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा कोल्हापुरी पॅटर्न यशस्वी | पुढारी

कोल्हापूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा कोल्हापुरी पॅटर्न यशस्वी

कोल्हापूर; विकास कांबळे :  पुरोगामी, परिवर्तनवादी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरने अनेक चळवळींची मुहूर्तमेढ रोवली आणि पुढे त्या चळवळीचे लोण राज्यभर नव्हे तर देशभर पसरल्याचे आपणास पहावयास मिळते. चांगल्या बदलाला नेहमीच सुरुवातीला विरोध होतो. पर्यावरणपूरक गणेश विसर्जन चळवळीचे देखील असेच झाले. परंतु काळ जाईल आणि प्रदूषणाचे महत्त्व कळेल तसे विरोध करणारे देखील या चळवळीत सामील होऊ लागले आणि ही चळवळ व्यापक झाली. तीन दशकांपासून सुरू असलेल्या या चळवळीला आता यश आले आहे. यावर्षी सार्वजनिक पाणवठ्यावर गणेशमूर्तींचे विसर्जन न करता कोल्हापूरकरांनी परितर्वनवादी चळवळीचे आणखी एक पाऊल टाकले आहे.

निर्माल्य संकलन ते पर्यावरणपूरक विसर्जन

गणेशमूर्तींचे विसर्जन करू नका, असे प्रथम सांगितले तर नागरिक अंगावर येतील याची जाणवी होती. म्हणून काय करता येईल यावर शिवाजी पेठेतील प्रथम जीवन बोडके, (कै) सतीश पोतदार, राजू राऊत, बंडा पेडणेकर, गिरीश उगळे, प्रदीप कांबळे व मिलिंद यादव यांनी चर्चा केली. ते वर्ष होते 1985. या चर्चेत प्रथम निर्माल्य पाण्याबाहेर जमा करण्याचे ठरविले आणि निर्माल्य दानाच्या रूपाने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाच्या उपक्रमाचा पाया रोवला गेला. हे तरुण रंकाळ्यावर निर्माल्य बाहेर जमा करू नका, असे सांगत राजघाटावर दिवसभर थांबले. परंतु त्यांचे कोणी ऐकले नाही. दिवसभरात एकाच कुटुंबाने पाण्याबाहेर निर्माल्य जमा केले. ते कुटुंब होते जीवन बोडके यांचे. याची व्याप्‍ती कशी वाढविता येईल याचा त्यांनी विचार केला. यासंदर्भात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्याशी चर्चा केली.

निर्माल्य संकलनाला प्रतिसाद मिळाला

निर्माल्य संकलनासाठी वर्षभरात समाजातील विविध घटकांचा सहभाग वाढविण्यासाठी या मंडळींनी प्रयत्न सुरू केले. यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यावर त्यांनी भर दिला. विज्ञान प्रबोधिनी ही संस्थाही सहभागी झाली. उदय कुलकर्णी हे या संस्थेचे मार्गदर्शक आहेत. यामध्ये निहाल शिपूरकर, राजू ढवळे, उदय गायकवाड, महेश शिवपुजे, संजय पेडणेकर, आनंद आगळगावकर, राजू बुरसे, रवींद्र गुजर, रवी कोठीवाले हे कार्यकर्ते होते. पर्यावरण अभ्यास डॉ. मधुकर बाचुळकर यांनीही या उपक्रमास बळ दिले. त्यामुळे हळूहळू पाण्याबाहेर निर्माल्य संकलनास प्रतिसाद मिळू लागला. आठ वर्षे हा उपक्रम सुरू होता. या मंडळींना केवळ निर्माल्य पाण्याबाहेर ठेवायाचे नव्हते तर गणेशमूर्ती देखील पाण्यापासून बाहेर ठेवायच्या होत्या. परंतु लोकांकडून त्याला विरोध होत होता. सात वर्षांत निर्माल्य संकलनास शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. हे नेण्यासाठी महापालिकेने आपली यंत्रणा लावली आणि अप्रत्यक्षपणे या चळवळीत शासनही सहभागी झाले.

गौरी मुखवट्यांचे संकलन

सात वर्षांत निर्माल्य संकलनास यश आल्यानंतर 1990-91 मध्ये गणेशमूर्ती दान संकल्पना राबविण्याचा विचार होता. परंतु, लोकांची मानसिकता अजूनही तयार नव्हती म्हणून निर्माल्याबरोबर गौरी, शंकरोबाचे मुखवटे त्यांनी दान करण्यास आवाहन केले. तोपर्यंत महाविद्यालयातील एनएसएस, एनसीसीचे विद्यार्थी यांना सहभागी करून घेण्यात आले होते. चळवळीचे बळ वाढत होते. याच दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीही यामध्ये सहभागी झाले. गोरी, शंकरोबा मुखवटे दान संकल्पने फारसा विरोध झाला नाही. पहिल्या वर्षीपासून नागरिकांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पुढच्या वर्षापासून गणेशमूर्ती दान संकल्पना राबविण्यास सुरुवात केली.

सन 1993-94 ला मूर्ती दान संकल्पनेस व्यापक स्वरूप

रंकाळ्यावर गणेशमूर्ती दान उपक्रमास सुरुवात झाल्यानंतर सन 1993-94 मध्ये याला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला. के. डी. खुर्द, अनिल चव्हाण आणि त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम पंचगंगा नदीवर राबविण्यास सुरुवात केली. जे अपेक्षित होते तेच घडले. याला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध करण्यास सुुरुवात केली. त्यामुळे पंचगंगा नदीवर तणावाचे वातावरण बनले. या चळवळीला गालबोट लागते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिस प्रशासनाने मध्यम मार्ग काढत अप्रत्यक्षपणे मूर्ती दान संकल्पनेस सहकार्यच केले. लोकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन जर पोलिस प्रशासनाने निर्णय घेतला असता तर अवघड झाले असते. सलग चार, पाच वर्षे पंचगंगा नदीवर हा वाद सुरू होता. परंतु नंतर मात्र विरोध कमी होत गेला आणि या चळवळीने गती घेतली.

सन 2015 पासून जिल्हा परिषद सहभागी

पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्‍न ऐरणीवर आल्यानंतर जिल्हा परिषदेलाही पंचगंगा प्रदूषणास जबाबदार धरण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेने सन 2015 पासून पर्यारवणपूरक गणेशोत्सव हा उपक्रम सुरू केला. त्यामुळे या चळवळीचे लोण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचविण्याचे अतिशय मोठे काम जिल्हा परिषदेने केले आहे. दरवर्षी या उपक्रमास प्रतिसाद वाढत आहे.

शंकराचार्यांचे पत्र

गणेशमूर्ती पाण्यातच विसर्जित केली पाहिजे असे नाही, यासंदर्भातील माहिती देणारे पत्र करवीर पीठाच्या शंकराचार्यांकडून विज्ञान प्रबोधिनी संस्थेने घेतले. या पत्राचे पोस्टर करून लावण्यात आले होते. त्यामुळे मूर्ती दान संकल्पेनस विरोध करण्याचा विरोध मावळण्यास मदत झाली. गणेशमूर्ती विसर्जन कुंडाची संकल्पना राजे संभाजी तरुण मंडळाची नदीमध्ये किंवा रंकाळ्यामध्ये विसर्जन करायचे नाही तर भाविकांना पर्याय देणे आवश्यक होते. यातूनच गणेशमूर्ती विसर्जन कुंडाची संकल्पना पुढे आली. राजे संभाजी तरुण मंडळाने पहिले गणेश विसर्जन कुंड संध्यामठसमोर तयार करून पर्याय दिला होता. ही संकल्पना पुढे महापालिकेने राबविली.

सार्वजनिक पाणवठ्यावर मूर्ती विसर्जित नाही

एखादी चळवळ चांगली असली की त्याला प्रशासनाही सर्व घटकांतून प्रतिसाद मिळतो हे गणेशमूर्ती दान संकल्पनेतून दिसून आले. यावेळी पंचगंगा घाटावर विसर्जनास परवानगी न दिल्यामुळे पंचगंगा घाटावर एकही मूर्ती पाण्यात विसर्जित झाली नाही. रंकाळ्यावरील तांबट कमानी जवळील किरकोळ प्रकार वगळता गणेशमूर्ती दान संकल्पनेस शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

शहरातील गणेशमूर्ती संकलन :  55,344
शहरातील निर्माल्य संकलन :  135 टन
ग्रामीणमधील गणेशमूर्ती संकलन : 2 लाख 71 हजार 449
ग्रामीणमधील निर्माल्य संकलन  : 531 टन
ग्रामीण भागात घरीच विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती :  1 हजार 986

Back to top button