मेघोली तलाव फुटला अन् एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं! (ग्राऊंड रिपोर्ट) | पुढारी

मेघोली तलाव फुटला अन् एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं! (ग्राऊंड रिपोर्ट)

गारगोटी/ कडगाव : रविराज पाटील/रविंद्र देसाई : भुदरगड तालुक्यातील मेघोली लघू पाटबंधारे तलाव बुधवारी रात्री फुटला. केवळ अडीच तासांत या तलावातील पाणी वाहून जाऊन तलाव रिकामा झाला आहे. मेघोली तलाव मधील पुराच्या पाण्यात बुडून नवले येथील जिजाबाई धनाजी मोहिते या महिलेसह चार जनावारांचा मृत्यू झाला. तलावाच्या बांधातील माती, दगड, गोटे वाहून ओढ्याकाठच्या शेतीत पडल्याने शेकडो एकर शेतीसह पिके पुर्णतः: उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे या परिसरात ढगफुटी सारखे दृश्य झाले आहे.

१९९६ साली या तलावाच्या कामाला सुरुवात झाली. २००० साली या तलावात प्रथम पाणीसाठा करण्यात आला. ९८ दलघफू पाणीसाठा केला जात होता. या तलावाच्या कामासाठी सुमारे ४ कोटी ७० लाख रूपये खर्च झाले. सुरूवातीपासूनच या तलावात गळती लागली होती. तलावाची गळती काढावी यासाठी या परिसरात शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली होती.

तत्कालीन सभापती किर्ती देसाई यांनी पंचायत समितीच्या बैठकीत वेळोवेळी तलावाच्या दुरुस्तीची मागणी केली होती. गत वर्षी आमदार प्रकाश आबिटकर, बाबा नांदेकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन गळतीची पाहणी केली होती. दुरुस्तीचा प्रस्ताव हा नाशिक येथे पाठविण्यात आला होता. तरी देखील दुरूस्तीसाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत.

बुधवारी रात्री ९.४५ वाजता सुमारास मोठ्या प्रमाणात पाणी ओढ्याला पाणी वाढल्यामुळे ग्रामस्थांना तलाव फुटला असल्याची शंका आली. ग्रामस्थांसह अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती मेघोली, वेंगरूळ, ममदापूर, तळकरवाडी, सोनुर्ली या गावांना देऊन सतर्क केले.

चार जनावारांचा अद्याप शोध लागला नाही…

मात्र, नवले येथील धनाजी मोहिते, त्यांची पत्नी जिजाबाई, मुलगा नामदेव ओढ्याशेजारील जनावारांच्या गोठ्यात जनावरे सोडण्यासाठी गेले होते. यावेळी जिजाबाई पाण्यातून वाहून जाऊन बुडून मृत्यू झाला. तर मुलगा नामदेव मोहिते झाडांचा आधार घेत बचावला. त्यांच्या चार जनावारांचा अद्याप शोध लागलेला नाही.

निवृत्ती मोहिते यांच्या जनावारांच्या गोठ्यातील तीन म्हशी व एक बैल दगावला. चार मोटरसायकल वाहून गेल्या आहेत. तर जनावारांना वाचविण्यासाठी गेलेले सचिन कुंडलीक पाटील, संतोष पाटील, प्रविण पाटील, भाऊ पाटील हे सुदैवाने बचावले आहेत.

पाण्याचा प्रवाह प्रचंड…

पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यामुळे काळोख्या रात्री काय घडत आहे. याची कल्पना नागरिकांना आली नाही. त्यामुळे मेघोली, नवले, तळकरवाडी, सोनुर्ली, वेंगरूळ गावात गोंधळाचे वातावरण होते. तलावातील पाण्याच्या प्रवाहातून झाडे-झुडपे, माती दगड, गोटे वाहून येऊन ओढ्याकाठच्या पिकांत येऊन पडल्याने शेकडो एकर पिकासह शेती पुर्णतः उद्ध्वस्त झाली आहे.

अडीच तासांत तलाव झाला रिकामा…

केवळ अडीच तासांत तलावातील पाणी वेदगंगा नदीत वाहून जाऊन तलाव रिकामा झाला. तलावाच्या पाणी सोडण्याच्या हॉल्वजवळील सुमारे ५० मीटरची भिंत वाहून गेली आहे. पाणी सोडण्यासाठीचा काँकिटचा पिलर फक्त उभा आहे. ओढ्याकाठचे विद्युत पोल पडले आहेत तर शेकडो मोटर पंपांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, गारगोटी- वेसर्डे रोडवरील वेंगरूळ जवळचा पूल पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याने या मार्गावरून वेसर्डे, नवले, आजरा या ठिकाणी होणारी वाहतूक बंद झाली आहे.

दरम्यान, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, तहसिलदार अश्विनी अडसुळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

हे ही वाचा :

पहा व्हि़डिओ : भुदरगड तालुक्यातील मेघोली लघू पाटबंधारे तलाव बुधवारी रात्री फुटला

Back to top button