

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : बारावीच्या निकालात (Mission Admission) यावर्षी गुणांची खैरात असल्याने याचा थेट परिणाम एफवायच्या पदवी अभ्यासक्रमांच्या कटऑफवर झाला आहे. टॉप महाविद्यालयांच्या यादींचा कटऑफ 90 ते 95 टक्केहून अधिक लागला. गतवर्षीच्या तुलनेत नामवंत महाविद्यालयांच्या कटऑफमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
अनेक विद्यार्थ्यांना 90 प्लस गुण असल्याने सर्वांनीच अपेक्षा टॉप महाविद्यालयांची ठेवल्याने अनेकांना तिसर्या यादीनंतरही प्रवेशापासून दूर राहावे लागले आहे. जागा कमी आणि अर्ज अधिक अशी परिस्थिती ठराविक महाविद्यालयात झाल्याने 90 टक्के गुणही कमी पडले असल्याची भावना अनेकांची झाली आहे. (Mission Admission)
दहावी आणि बारावीचे सर्वच मंडळाचे निकाल हे अंतर्गत मूल्यमापन आधारित जाहीर झाले. यावर्षी गुणवंत विद्यार्थी संख्या मोठी आहे. बारावीत 75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे प्रथम वर्ष पदवीच्या प्रवेशात अनेक विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा आली आहे.
अनेक महाविद्यालयातील इनहाउस कोटा आणि त्यानंतर ज्यांना महाविद्यालय बदलून हवे आहे किंवा ठाणे, कल्याण आणि अन्य उपनगरांतून मुंबईला येणारे अशा विद्यार्थ्यांनी नामवंत महाविद्यालयातील शिल्लक जागांवर प्रवेशासाठी अर्ज भरल्याने पहिल्याच यादीत नामवंत महाविद्यालयांतील जागा फुल्ल झाल्या. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अखेरच्या यादीपर्यंत झगडावे लागले. हातात 85 ते 90 टक्क्यांची गुणपत्रिका असूनही अनेकांना मात्र प्रवेशासाठी अक्षरशः घाम फुटला.
अशी परिस्थिती दुसर्या यादीपर्यंत विद्यार्थ्यांची झाली. तिसर्या यादीत अनेकांनी मग मागणी कमी असलेली महाविद्यालये असलेली महाविद्यालय शोधून प्रवेश घेतला तर 90 तसेच 85 टक्के गुण असणार्यांनी आपल्याला हव्या त्या महाविद्यालयांच्या अपेक्षा केल्याने प्रवेशापासून दूरच राहावे लागले आहे.
कला शाखेला यंदा डीमांड वाढला त्याचबरोबर विज्ञान पारंपरिक शाखेलाही गतवर्षीच्या तुलनेत प्रवेश अधिक झाले. मात्र सर्वाधिक मागणी ही सेल्फ फायनान्स हे अभ्यासक्रम व्यवसायाभिमुख असल्याने तिकडे मागणी अधिक असल्याचे महाविद्यालयांचे म्हणणे आहे. हा अभ्यासक्रम विनाअनुदानित आणि जागा कमी असल्याने प्रवेश मिळालेच नाही अशा तक्रारी होत्या. काही महाविद्यालयांनी जागा वाढवून प्रवेश दिले तर अनेक महाविद्यालयांनी असलेल्या जागा ंवरच प्रवेश दिल्याचे सांगितले.
मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि जी काही नामवंत मुंबईतील महाविद्यालये आहेत त्या महाविद्यालयातील जागा पहिल्या यादीत भरलेल्या दिसल्या. अनेक विद्यार्थ्यांनी इनहाऊस कोट्यातून प्रवेश निश्चित केल्याने बाहेरील विद्यार्थ्यांसाठी जागा खूप कमी होत्या. असे महाविद्यालयांनी सांगितले तर काही जागा होत्या त्या टॉपर्स विद्यार्थ्यांनी पटकवल्या आहेत. त्यामुळे साहजिकच लिस्ट 95 टक्क्यावर पोहचली त्यामुळे आता जागाच नाहीत अशी स्थिती आहे. हातात 90 टक्केहून गुण असताना प्रवेश मिळत नाही अशी स्थिती असल्याचे प्राचार्यांकडून सांगण्यात आले.
बारावीनंतर अभियांत्रिकी तसेच औषधनिर्माणशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी आवश्यक असलेली सीईटी झालेल्या नाहीत. यामुळे या विद्यार्थ्यांनी पारंपरिक बीएस्सीसाठी प्रवेश घेतला आहे. जे काही सीईटीनंतर जाणारे आहेत ते बहुतांश विद्यार्थी टॉपर्स आहेत. सीईटी होवून व्यावसायिक अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र आदी अभ्यासक्रमांना जाणार आहेत. मात्र त्याची कार्यवाहीच नसल्याने त्या जागा अनेकांकडून भरल्या आहेत.
त्यामुळे या जागा नंतर रिकाम्या होतील पण सीईटीचे अद्याप वेळापत्रकच नाही अशी अवस्था आहे. ज्या विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही असे विद्यार्थी या जागावर प्रवेश घेवू शकतील पण इतका वेळ विद्यार्थी थांबणार नाहीत त्यामुळे या जागा आता भरल्यात पण रिकाम्या राहतील असेही महाविद्यालयांना वाटत आहे.