मेघोली लघु पाटबंधारे तलाव फुटला : पाच गावांना सतर्कतेचा इशारा | पुढारी

मेघोली लघु पाटबंधारे तलाव फुटला : पाच गावांना सतर्कतेचा इशारा

गारगोटी : पुढारी वृत्तसेवा

मेघोली लघु पाटबंधारे तलाव बुधवारी (दि.१) रात्री १०.३० वा. दरम्यान फुटल्याने पाच गावांतील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाण्याच्या प्रवाहाने वेंगरूळ ममदापूर दरम्यान चार ओढ्यावरील पुल वाहून गेला आहे. तर नवले येथील सहा जनावरे वाहून गेली आहेत.

मेघोली ल. पा तलाव २२ जुलै रोजी पूर्ण क्षमतेने भरला होता. तलावात ९८ दलघफू पाणी साठा झाला होता. तलाव बांधल्यापासुनच पायातून गळती लागली होती. त्यामुळे तलाव दुरुस्तीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे सादर केला होता. गेल्या काही दिवसांपासून तलावाच्या गेटजवळून पाणी गळती वाढली होती. त्यामुळे जलसंपदा विभागाने वाळूची पोती ठेवली होती व नागरिकांनाही माहिती दिली होती.

बुधवारी रात्री १०.३० वा. नंतर ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने मेघोली ग्रामस्थांनी प्रशासनाला माहिती दिली. उप अभियंता संभाजी भोपळे, शाखा अभियंता समीत्रराजे शिर्के यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मेघोली, नवले, वेंगरूळ, शेळोली या गावांना सतर्कतेचा इशारा दिला.

या घटनेमुळे पाच गावातील नागरिक तणावाखाली आहेत. नवले येथील ओढ्याशेजारील काही घरांमध्ये पाणी शिरले होते. ओढ्याकाठची ऊस, भात पिके पाण्याखाली गेली आहेत. वेदगंगा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली. अंधारातून वाट काढत जलसंपदा विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. सुमारे ५० मीटर लांबीची भिंत तूटून गेली आहे. तर गारगोटी वेसर्डे मार्गावरील वेंगरूळ ओढ्यावरील पुल पाण्याच्या प्रवाहाने तुटून गेला. आमदार प्रकाश आबिटकर यांनी पोलीस यंत्रणेला लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान रात्री उशिरा कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी धनस्थळी भेट देऊन पाहणी केली.

सुमारे २००० हजार साली हा तलाव बांधला होता. यामुळे मेघोली, नवले, तळकरवाडी, वेंगरूळ या चार गावातील ४०० हेक्टर शेतीला पाणी पुरवठा होत होता. तलाव फुटल्याने पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.

Back to top button