केसगळती आणि कोरोना, हे आहेत उपाय | पुढारी

केसगळती आणि कोरोना, हे आहेत उपाय

डॉ. अश्‍विनी राऊत

कोरोना झाल्यावर घ्यावी लागणार्‍या औषधांचा शरीर आणि मनावर विपरीत परिणाम झालेला दिसतो. केसांवरही याचा विपरीत परिणाम होतोय हे दिसून आले. केसगळती होण्याचे प्रमाण वाढलेले आढळते. परंतु, ही केसगळती तात्पुरत्या स्वरूपाची आहे, या अवस्थेस ‘टेलोजेन ईफ्लूजीएम’ असे म्हणतात.

कारणे :

1 : आहार
2 : ताणतणाव
3 : आर्थिक परिस्थिती
4 : कुटुंबापासून वेगळे राहणे
5 : भीती

या सगळ्या कारणांचा मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो आणि केसगळतीस सुरुवात होते.

उपाय :

1 : ताणतणावातून स्वतःची सुटका करून घ्या. त्यासाठी कोरोनातून बरे झाल्यावर योगा, प्राणायाम आणि हलका व्यायाम करायला सुरुवात करा. मोकळ्या हवेत फिरा. मनावरील ताण कमी करण्यासाठी आवडणार्‍या गोष्टींमध्ये वेळ घालवा.
घडून गेलेल्या वाईट गोष्टीबद्दल, अनुभवाबद्दल सतत दुसर्‍यांना बोलणे, त्याचा सतत विचार करणे किंवा त्याच भीतीमध्ये वावरणे हे टाळा. सकारात्मक विचार आणि द‍ृष्टिकोन ठेवा.

2 : आहारावर लक्ष केंद्रित करा :

कोरोना झाल्यावर शरीरातील प्रतिकारशक्‍ती कोरोनाशी झुंज देता देता कमजोर होऊ लागते. म्हणून कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर काही दिवस थकवा, अशक्‍तपणा जाणवतो. त्यासाठी आहारात बदल करणे गरजेचे आहे.

– संतुलित आहाराचा समावेश करा.
– ड्राय फ्रुट, फळे, पालेभाज्या यांचे सेवन वाढवा.
– मांसाहार, अंडी घ्या.
– लिंबू, आवळा घ्या.
– गोड पदार्थ, बेकरी पदार्थ टाळा.

3 : कोणतेही हेअर प्रॉडक्ट वापरू नका :

रोज रात्री झोपताना केसांना हलक्या हाताने तेलाची मालिश करा. त्यामुळे झोप तर शांत लागतेच आणि शारीरिक मानसिक तणाव कमी होतो. हेअर स्ट्रेंटनर, क्रीम अशा केमिकलयुक्‍त प्रोडक्टचा वापर करू नका. आठवड्यातून दोन वेळा सौम्य शॅम्पूने केस धुवा. केस धुण्यापूर्वी खोबरेल तेलात किंवा तीळ तेलात जास्वंदाची फुले, कोरफड गर, आवळा पावडर किंवा रस, असे सहज उपलब्ध होणारे साहित्य टाकून उकळून घ्यावे आणि तेल कोमट झाल्यावर केसांना पंधरा मिनिटे मसाज करावा.

4 : सप्लिमेंट गोळ्यांचा वापर करावा :

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्‍तवाढीच्या गोळ्या, मल्टीव्हिटॅमिन गोळ्या घ्या.

5 : रोज सकाळी कोवळ्या उन्हात 10 ते 15 मिनिटे बसा.

या जीवनशैलीच्या नित्य उपयोगाने काही महिन्यांत केसगळती कमी होऊन नवीन केस येण्यास सुरुवात होते. शिवाय केस काळेभोर, घनदाट, लांब होण्यासाठी वरील उपाययोजना फायदेशीर ठरतातच. परंतु, या जीवनशैली सोबत शिरोधारा ही आयुर्वेदिक थेरेपी सुरू केल्यास कमी वेळात केस सुंदर आणि घनदाट होतात.

शिरोधारा :

डोक्यावर आणि कपाळावर औषधी द्रव्यांची धारा सोडणे म्हणजेच शिरोपरिषेक करणे. सर्वाधिक लोकप्रिय असणारे हे कर्म शिर:षेक, शिर:सेचन अशा नावांनी प्रचलित आहे. रुग्ण व्याधी, प्रकृती नुसार दूध, तेल, क्वाथ यांचा वापर केला जातो.

1 : केसांतील कोंडा

2 : केसगळती

3 : वारंवार होणारी डोकेदुखी

4 : केसांत होणारे व्रण, लहान लहान पुटकुळ्या येणे

5 : झोप न लागणे

6 : मानसिक कारणे : ताणतणाव, भीती, नकारात्मक विचार यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते.

हे कर्म करताना तेल अधिक गरम व शीत असू नये. तेल कोष्ण असावे. धारा सतत असावी. खंड पडणारी नसावी.

शिरोधारा सकाळी सात वाजता किंवा संध्याकाळी 6 वाजता करावी. याचा कालावधी 45 ते 60 मिनिटांपर्यंत असावा. रुग्णप्रकृती, व्याधी, त्यानुसार द्रव्य याचा विचार करून हे कर्म करावे. शिरोधारा करण्यासाठी वेगळी प्रशस्त स्वच्छ खोली असावी. शक्य असल्यास एखादे मन:शांत करणारे संगीत लावावे. रुग्णाला डोळे बंद करून झोपायला सांगावे. त्यामुळे मनाचा आणि शरीराचा थकवा जाऊन उत्साह वाढतो. आयुर्वेद शास्त्रामधील हे प्रचलित कर्म डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावे.

Back to top button