गॅस सिलिंडर कोल्हापुरात ८ महिन्यांत २५० रुपयांनी महाग | पुढारी

गॅस सिलिंडर कोल्हापुरात ८ महिन्यांत २५० रुपयांनी महाग

कोल्हापूर : सचिन टिकपुर्ले

घरगुती गॅस सिलिंडर दरात 25 रुपयांची वाढ झाल्याने कोल्हापुरातील गॅस सिलिंडरचा दर 888 रुपये झाला आहे. गेल्या आठ महिन्यांत गॅस दरात 250 रुपयांची वाढ झाली आहे.

केंद्र सरकारने घरगुती गॅस (एलपीजी) सिलिंडर किमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. अगोदरच गॅस दरात सततची वाढ होत आहे. त्यातच सबसिडी नसल्याने या जादा दराचा फटका ग्राहकांना बसत आहे. दरवाढीनंतर ग्राहकांना जादा दराने गॅस सिलिंडरची विक्री करण्यात आली.

आम्ही दरवाढीच्या अगोदर बुकिंग केले आहे. त्यामुळे जुन्या दराने गॅस मिळावा, यासाठी ग्राहक व गॅस एजन्सी यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी गॅस वितरकांनी दर वाढले व कमी झाले की त्याच दिवसापासून अंमलबजावणी केली जाते, असे सांगितले. जानेवारी महिन्यात सिलिंडरचा दर 647 रुपये होता, तो आता 888 रुपये झाला आहे.

घरगुती गॅस सिलिंडर दरात गेल्या आठ महिन्यांत पाचवेळा वाढ झाली. गॅस सिलिंडरवर केंद्राचा एकच कर असतो. राज्याचा कोणताही कर नसतो; पण वाहतूक दरात प्रत्येक सिलिंडरमागे दरवाढ होत असल्याने प्रत्येक जिल्ह्यातील गॅस सिलिंडरच्या दरात तफावत असते. गेल्या आठ महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील सिलिंडर दरात 250 रुपयांची वाढ झाल्याचे घोटणे गॅस एजन्सीचे संचालक शेखर घोटणे यांनी सांगितले.

Back to top button