भूगर्भ शास्त्रज्ञ यांच्याकडून भूस्खलनाची पाहणी; जिल्हाधिकार्‍यांना अहवाल देणार | पुढारी

भूगर्भ शास्त्रज्ञ यांच्याकडून भूस्खलनाची पाहणी; जिल्हाधिकार्‍यांना अहवाल देणार

केळघर : (पुढारी वृत्तसेवा) :

सातारा जिल्ह्यात 22 व 23 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने जावली व महाबळेश्वर तालुक्यात जिवित हानी होण्याबरोबरच जमिनींचे व घरांचेही मोठे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञ सातारा जिल्ह्यात आले आहेत. महाबळेश्वर तसेच जावली तालुक्यातील काही गावांमध्ये त्यांनी नुकसानीची पाहणी केली. याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येणार आहे.

अतिवृष्टीमुळे जावली तालुक्यात केळघर परिसरातील बोंडारवाडी, भुतेघर, वाहिटे या गावांच्या वरील डोंगरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. भविष्यात याचा गावांनाही धोका आहे. त्यामुळे या परिसराची केंद्रीय भूगर्भ शास्त्रज्ञ यांच्या पथकाने पाहणी केली, अशी माहिती जावलीचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी दिली.

केळघर परिसरातील बोंडारवाडी, भुतेघर, वाहिटे या महाबळेश्वरच्या पायथ्याला डोंगरकड्याखाली वसलेल्या गावांच्यावरील कडे, दरडी, माती या पावसाने ओढे, ओहोळ, नदीपात्रामध्ये येवून त्यांची पात्रे बदलली. पिकांसह शेतीचे अतोनात नुकसान झाले. ही शेती पुन्हा लागवडी योग्य तयार करणे शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेरचे आहे.

भविष्यात अशा प्रकारची अतिवृष्टी झाली तर या गावांनाही धोका आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी आमचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी मागणी सरकारकडे केली होती. त्यानुसार या परिसरात भूस्खलन कोणत्या कारणाने झाले याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञ श्रीमती परिमिता, श्रीमती रिंपी गागाई यांच्या टिमने बोंडारवाडी, भुतेघर,वाहिटे या बाधित गावांना भेट दिली व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी जावली तहसिलदार राजेंद्र पोळ, मंडलाधिकारी ए. आर. शेख, तलाठी मकरध्वज डोईफोडे, बोंडारवाडी, भुतेघर, वाहिटे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button