कोल्हापूर : हद्दवाढीसाठी रस्त्यावर संघर्ष | पुढारी

कोल्हापूर : हद्दवाढीसाठी रस्त्यावर संघर्ष

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा इतर शहरांची हद्दवाढ वारंवार होत असताना कोल्हापूरवर मात्र अन्याय सुरू आहे. हद्दवाढीच्या मागणीसाठी यापुढे रस्त्यावरील संघर्ष अटळ असल्याने रस्त्यावरील आंदोलन केले जाईल, असा इशारा कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत देण्यात आला. समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली.

खंडपीठ आणि हद्दवाढीसाठी आयुष्यातील आणखी किती वर्षे घालवायची, असा सवाल करून आर. के. पोवार म्हणाले की, महापालिकेच्या पहिल्या सभागृहापासून हद्दवाढीची मागणी करत आहोत. विविध आंदोलने झाली. मात्र अद्याप यश आले नाही. आता ठोस निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी रस्त्यावरील लढाईची सुरुवात करूया. महापालिका निवडणुकीची धामधूम पाहता जोपर्यंत हद्दवाढ होत नाही, तोपर्यंत महापालिका निवडणूक घेऊ नका, अशी मागणीही पोवार यांनी केली.

ग्रामीण भागातील विरोध शमविण्यासाठी जनरेटा वाढविला पाहिजे. आंदोलनातून ठोस भूमिका घेऊन सरकारला ठोस निर्णय घ्यायला भाग पाडले पाहिजे, असे बाबा पार्टे यांनी सांगितले. हद्दवाढ ही जिल्ह्याच्या विकासासाठी हवी आहे. केंद्रातून निधी मिळविणे हा हेतू नाही; तर देशात जिल्हा अव्वल झाला पाहीजे या भूमिकेतून हद्दवाढ झाली पाहिजे. त्यासाठी रस्त्यावरील लढाईची वेळ आली आहे. या लढाईमुळेच सरकारला जाग येईल. खंडपीठही सर्वसामान्य जनतेशी निगडित आहे. 20 वर्षे हायकोर्टात हेलपाटे मारावे लागतात. राजकीय वस्त्रे बाजूला ठेवून एकसंध आंदोलन केले पाहिजे, असे अ‍ॅड. बाबा इंदुलकर म्हणाले.

महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी खंडपीठाबाबत जिल्ह्यातील आमदार व खासदार यांची संयुक्‍त बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. त्यामुळे खंडपीठाचा प्रश्‍न मार्गी लागण्यास आता वेळ लागणार नाही. मात्र हद्दवाढीसाठी संघर्ष करावा लागेल. 11 सप्टेंबर रोजी व्यापक मेळावा घेऊन आंदोलनाची धार वाढवूया. यासाठी बार असोसिएशन पुढाकार घेईल, असे सांगितले. हद्दवाढीसाठी प्रथम प्राधिकरण रद्द केले पाहिजे. कोल्हापूरबाबत सतत वापरा आणि फेकून द्या, अशी वृत्ती आहे. जिल्ह्यात मंत्री येतात. लोकांचे गार्‍हाणे ऐकून घेत नाहीत. मंत्र्यांनी या प्रश्‍नावर वेळ दिली पाहिजे. मराठा आंदोलनात ज्याप्रमाणे कोल्हापुरात येऊन मंत्र्यांनी भूमिका ऐकली, त्याचपद्धतीने हद्दवाढीच्या प्रश्‍नावरही रान उठविले पाहिजे. त्यासाठी दबाव निर्माण करण्याची गरज असल्याचे दिलीप देसाई यांनी सांगितले.

रस्त्यावरील लढाईसोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दारात ठिय्या आंदोलन केले पाहिजे. प्रश्‍न सुटत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवूया, असे आपचे संदीप देसाई म्हणाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघेही या प्रश्‍नावर सकारात्मक आहेत. या संधीचा फायदा घेतला पाहीजे, असे लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी सांगितले. रस्त्यावरील आंदोलनासह सरकारशी वाटाघाटी केल्या पाहिजेत, असे किशोर घाटगे म्हणाले. हद्दवाढीच्या प्रश्‍नावर आता तीव आंदोलनाची गरज असल्याचे ब्लॅक पँथर पक्षाचे सुभाष देसाई यांनी सांगितले. कोल्हापूरवर सतत अन्याय होतो. कायम दुर्लक्ष केले जाते. याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे, असे माजी नगरसेवक अनिल कदम म्हणाले. पूजा साळोखे, राजू जाधव यांची भाषणे झाली. अ‍ॅड. महादेवराव आडगुळे यांनी हद्दवाढीसाठी संघर्ष केला पाहिजे, असे सांगून आभार मानले.

बैठकीस कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गिरीश खडके, अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, कॉ. दिलीप पवार, माजी नगरसेवक अशोक भंडारे, संभाजीराव जगदाळे, बी. एल. बरगे, माजी महापौर मारुतराव कातवरे, लाला गायकवाड, शीतल तिवडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button