कोल्हापूर : शिवसेनेकडून आरटीओ पाटील धारेवर | पुढारी

कोल्हापूर : शिवसेनेकडून आरटीओ पाटील धारेवर

कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : प्रादेशिक परिवहन कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रतिमा लावल्या नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे आरटीओसमोर जोरदार निदर्शने करून प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना धारेवर धरले. महापुरुषांचा अवमान करणार्‍या पाटील यांना निलंबित करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

प्रत्येक शासकीय कार्यालयात महापुरुषांची छायाचित्रे लावण्याचा नियम आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात या नियमाची पायमल्ली झाली आहे. कार्यालय प्रमुख या नात्याने पाटील यांनी आपल्या कक्षात महापुरुषांची छायाचित्रे लावणे आवश्यक असताना त्यांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रतिमा दीपक पाटील यांना दिल्या. आंदोलक आक्रमक झाल्याने कार्यालयात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.

कार्यालय नूतनीकरणावेळी हे फोटो काढण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. मात्र, या उत्तराने आंदोलकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे आंदोलक संतप्त बनले. पाटील यांच्या निलंबनाची मागणी केली. दरम्यान, भारतरत्न राजीव गांधी यांची प्रतिमा झेरॉक्स स्वरूपात असल्याचे निदर्शनास येताच आंदोलक पुन्हा संतप्त झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना शांत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रतिमा नियमानुसार लावल्या नसल्याचा आरोपही केला. तसेच या प्रतिमा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी का दिल्या, शासकीय कार्यालयाकडे पैसे नाहीत, असा सवाल यावेळी केला.

जिल्हा प्रमुख विजय देवणे, संजय पवार, सुनील मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात हर्षल सुर्वे, मंजीत माने, राजू जाधव, चंद्रकांत भोसले, दत्ताजी टिपुगडे, शशी बिडकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button