विकासासाठीच शिंदे गटात : खा. धैर्यशील माने | पुढारी

विकासासाठीच शिंदे गटात : खा. धैर्यशील माने

पेठवडगाव/किणी ; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्यवीर आणि थोर विभूतींच्या कार्यातून प्रेरित होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा ही संकल्पना राबवून जनतेच्या नसानसात देशभक्ती निर्माण करण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन खा. धैर्यशील माने यांनी पेठवडगाव येथे केले. मतदारसंघातील विकासासाठीच शिंदे गटात सामील झालो आहे. भविष्यात कोणावर टीका करणार नाही. येणार्‍या काळात मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात प्रवेश केलेल्या खा. माने यांनी रविवारी तिरंगा रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. किणी टोल नाक्यावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

हजारो दुचाकीस्वार यामध्ये सहभागी झाले होते. त्याचबरोबर किणी टोल नाका ते पेठवडगाव हा सारा मार्ग कार्यकर्त्यांच्या जल्लोषाने व घोषणांनी दणाणून गेला होता. पेठवडगाव येथे माने यांचे पारंपरिक वाद्यांच्या निनादात कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

यावेळी ज्येेष्ठ स्वातंत्र्यसैनिकांना खा. माने यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी खा. माने यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, माजी नगराध्यक्ष बळवंतराव यादव यांच्या पुतळ्यास, तर माजी नगराध्यक्ष स्व. शिवाजीराव सालपे यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन केल्यानंतर पेठवडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीची सांगता झाली.

डोळ्यांचे पारणे फिटले

मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणतीही तमा न बाळगता शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेशानंतर मत-मतांतरामुळे राजकीय वातावरण गढूळ झाले होते. या स्थितीत कार्यकर्त्यांनी आपल्या पाठीशी मोठी ताकद उभी करून भव्य तिरंगा रॅली काढली. हे पाहून डोळ्यांचे पारणे फिटले, असे खा. माने यांनी सांगितले.

Back to top button