हिंदुत्व जपण्यासाठीच क्रांती : राजेश क्षीरसागर | पुढारी

हिंदुत्व जपण्यासाठीच क्रांती : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत हिंदुत्वाचे धोरण आणि गेले अडीच वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होणारी गळचेपी मोडून शिवसैनिकांना न्याय देण्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत क्रांती झाली. ऑगस्ट क्रांतिदिनी या क्रांती रॅलीच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांना कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने पाठिंबा दर्शविण्यात येत आहे. आगामी काळात शिवसेना एकसंघपणे उभी करू, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.

युतीला शिवसैनिकांचा वाढता पाठिंबा

शिवसेना-भाजप युतीचे स्वागत होत असून शिवसैनिकांचा पाठिंबा वाढत आहे. क्रांती दिनानिमित्त शिवसेनेतर्फे दसरा चौकातून रॅलीचे आयोजन केले होते. ज्येष्ठ शिवसैनिकांच्या वतीने क्रांती ज्योत प्रज्वलित करून क्षीरसागर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. माजी शहरप्रमुख बाळ घाटगे, देवस्थान समिती माजी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सुजित चव्हाण, जयवंत हारुगले, शिवाजी जाधव, नंदकुमार मोरे, ऋतुराज क्षीरसागर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता झाली.

विरोध करणारे निष्ठा शिकवताहेत

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर युती केली नाही. 2019 ला भाजपसोबत युती असतानाही अनपेक्षितपणे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसैनिकांचे खच्चीकरण केले गेले. शिवसेना संपविण्याचा डाव होता. त्याविरोधात मुख्यमंत्री शिंदे यांनी पाऊल उचलले.

शिवसेनेला आणि धनुष्यबाणाला विरोध करणारे आम्हाला निष्ठा शिकवत आहेत. परंतु, खरे गद्दार तेच आहेत, असेही क्षीरसागर यांनी सांगितले. रॅलीत कार्यकर्त्यांच्या घोषणांनी रॅली मार्ग दणाणून सोडला. महिलांचा सहभाग लक्षणीय होता.रॅलीत राहुल चव्हाण, अजित मोरे, राजू हुंबे, पुष्कराज क्षीरसागर, महिला आघाडीच्या दिक्षा क्षीरसागर, मंगलताई साळोखे, पूजा भोर यांच्यासह शिवसैनिक सहभागी होते.

Back to top button