आतापर्यंत इचलकरंजी शहरातील 22 टोळ्यांना ‘मोका’ | पुढारी

आतापर्यंत इचलकरंजी शहरातील 22 टोळ्यांना ‘मोका’

इचलकरंजी : बाबासो राजमाने : इचलकरंजी शहरातील गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) चे हत्यार उपसत आजअखेर पोलिसांनी तब्बल 22 टोळ्यांवर मोकांतर्गत कारवाई केली आहे. आणखी काही टोळ्या रडारवर आहेत.

‘मोका’ कारवाईनंतर शिक्षा होण्यासाठी पोलिसांकडून आणखी प्रभावीपणे पाठपुरावा होण्याचीही तितकीच गरज आहे. इचलकरंजी शहराच्या विस्ताराबरोबर शहरातील गुन्हेगारीचा आलेखही वाढला होता. खून, खुनाचा प्रयत्न, चोर्‍या, अवैध व्यवसाय वाढीस लागले आहेत.
इचलकरंजीसह शहापूर, खोतवाडी, तारदाळ, यड्राव आदींसह औद्योगिक वसाहतींच्या परिसरात गुन्हेगारांनी वर्चस्व निर्माण केले होते. हाणामार्‍या तर नित्याच्याच बनल्या होत्या. खून, खुनाचा प्रयत्न, लूट, फसवणुकीचे प्रकारही वाढले होते. अनेक अल्पवयीन गुन्हेगारांचाही सहभाग वाढल्याने शहराचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले होते.

शहरात 2017 मध्ये पहिल्यांदा मोकांतर्गत कारवाई

निर्ढावलेल्या गुन्हेगारांना आवर घालण्यासाठी 2017 मध्ये पहिल्यांदा मोकांतर्गत कारवाईचे पाऊल उचलले. यावेळी 4 टोळ्यांवर, तर 2018 मध्ये 9 टोळ्यांना मोका लावण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मोकाचा धडाक कायम ठेवत तीन वर्षांत तब्बल 22 टोळ्यांवर कारवाई करून अनेकांना कारागृहात धाडले. मोकाच्या धास्तीने अनेकांनी गुन्ह्यापासून लांब राहणे, तर काहींनी शहर सोडणे पसंत केले.

इचलकरंजीपाठोपाठ जयसिंगपूर, शिरोळातही कारवाई

इचलकरंजीपाठोपाठ जयसिंगपूर, शिरोळ आदी ठिकाणच्या टोळ्यांवरही मोकाची कारवाई करण्यात आली. गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी गुंडांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी उचललेल्या या कारवाईची गुन्हेगारांत चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे अनेक टोळ्या नामशेष झाल्या आहेत. शहराच्या शांततेसाठी कायद्यामध्ये गुन्हेगारांना शिक्षा होऊन त्यांच्यावर कायद्याचा धाक राहण्यासाठी पोलिसांकडून गुन्हेगारांवर आणखीन जरब बसण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच घटना

इचलकरंजी शहरातील मोका कारवाई करण्यात आलेल्या 22 टोळ्यांमधील अमोल माळी, संजय तेलनाडे, सुदर्शन बाबर तसेच आनंदा जर्मनी या टोळ्यांवर दोनवेळा मोकांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. एकाच जर्मनी टोळीवर पाचव्यांदा मोकांतर्गत कारवाई करण्याची पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे. या टोळ्यांतील अनेक गुन्हेगार गेल्या अनेक वर्षांपासून कारागृहातच आहेत.

145 जणांवर कारवाई

इचलकरंजी शहरात पाच वर्षांत तब्बल 21 टोळ्यांवर मोकांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सर्वाधिक 10 गुन्हे शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडे दाखल आहेत. त्यापाठोपाठ शहापूर पोलिस ठाण्यात 8 गुन्हे दाखल आहेत. गावभाग आणि हुपरी पोलिस ठाण्याकडे प्रत्येक दोन गुन्ह्यांचा समावेश आहे. या टोळ्यांमधील सुमारे 145 जणांना पोलिसांनी जेलची हवा दाखवली आहे.

Back to top button