कोल्हापुरात आढळला ‘एग फ्रुट’ वृक्ष!

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : ‘एग फ्रुट’ म्हणजेच अंड्याच्या आकाराचे फळ असणार्या वृक्षाची कोल्हापुरात प्रथमच नोंद झाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या वनस्पती ग्रंथात या वृक्षाचा उल्लेख नाही. यामुळे या वृक्षाची राज्याच्या व जिल्ह्याच्या कोशात प्रथमच शास्त्रीय नोंद झाल्याची माहिती ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी दिली.
कोल्हापूर शहरातील वृक्षांचे निरीक्षण करताना वृक्षप्रेमी परितोष उरकुडे यांना रत्नापा कुंभारनगर- मोरेवाडी परिसरात शशिकला राणे यांच्या घराजवळ हे झाड दिसले. त्यांनी राणे कुटुंबीयांकडे चौकशी केली असता, हे झाडाचे रोप काही वर्षांपूर्वी कालिकतवरून आणल्याचे त्यांनी सांगितले. उरकुडे यांनी झाडाची फळे-फुले, फांद्या-पानांचे फोटो काढून बाचुळकर यांच्याकडे पाठविले. संदर्भ ग्रंथाच्या आधारे वृक्षाची ओळख पटली.
‘एग फ्रूट’ या इंग्रजी नावाने ओळखल्या जाणार्या या वृक्षाचे शास्त्रीय नाव ‘पाऊटेरिया कॅम्पिचिएना’ असे असून, हा विदेशी वृक्ष ‘सॅपोटेएसी’ म्हणजेच चिकूच्या कुळातील असल्याचे स्पष्ट झाले. या वृक्षाला ‘यलो सॅपोटी’, ‘कपकेक फ्रूट’ व ‘कॅनिस्टेल’ अशी इतरही इंग्रजी नावे आहेत. हा वृक्ष मूळचा मध्य अमेरिकेतील मेक्सिको या देशातील आहे. एग फ्रूटचे वृक्ष सॅल्वाडोर, ग्वाटेमाला या देशांतील जंगलांत नैसर्गिकपणे वाढलेले आढळतात. फळांसाठी या वृक्षांची अनेक देशांत लागवड करण्यात आली आहे. भारतात केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा या राज्यांत या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
‘एग फ्रुट’ आरोग्यासाठी लाभदायक
‘एग फ्रूट’ हा लहान ते मध्यम आकाराचा सदाहरित वृक्ष 10 मीटर उंचीपर्यंत वाढतो. बिया हुबेहूब चिकूच्या बियांप्रमाणे दिसतात. पिकलेली फळे, उकडून टरफल काढलेल्या अंड्याप्रमाणे मऊसर होतात, यामुळेच या वृक्षास ‘एग फ्रूट’ हे नाव पडले आहे. बियांपासून रोपांची निर्मिती करता येते. फळात पिष्टमय पदार्थ, मेह, प्रथिने, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस तसेच अ जीवनसत्त्व हे घटक आहेत. पिकलेली फळे खातात, ती चवीला गोड असतात; पण कच्ची फळे चवीला उग्र तुरट असतात. फळांच्या गरापासून आईस्क्रिम, जाम, जेली व मिल्कशेक बनवितात. मधुमेहींसाठी व हृदय बळकटीसाठी ही फळे उत्तम असल्याचे मानतात. फळे शक्तिवर्धक असून, कोलेस्टेरॉल कमी करण्यास उपयुक्त आहेत. तसेच मूत्रपिंड, डोळे, त्वचा व यकृत यांच्या आरोग्यासाठी ही गुणकारी व लाभदायक आहेत.