बाल आरोग्य मोहीम अधिक प्रभावीपणे राबवू : आ. हसन मुश्रीफ | पुढारी

बाल आरोग्य मोहीम अधिक प्रभावीपणे राबवू : आ. हसन मुश्रीफ

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : बाल आरोग्य मोहिमेत व्याधिग्रस्त चिमुकल्यांना जीवदान मिळत आहे. त्यामुळे ही मोहीम अधिक व्यापक करून प्रभावीपणे राबवू, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अभियानाची आढावा बैठक झाली. यामध्ये कागल, उत्तूर व गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या बाल आरोग्य मोहिमेचा आढावा घेण्यात आला.

पहिल्या टप्प्यात कागल तालुक्यातील 20 गावांमध्ये बाल आरोग्य मोहीम राबविली आहे. या मोहिमेंतर्गत दहा हजारांवर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी दोनशेहून अधिक विद्यार्थी शस्त्रक्रियेस पात्र आहेत. 78 विद्यार्थ्यांमध्ये तिरळेपणाचा दोष आढळला. 35 विद्यार्थ्यांवर हृदय शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. इतर आजारांचे 130 रुग्ण आहेत. आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, तिरळेपणामुळे देशात तीन टक्के मुलींची लग्ने होत नाहीत. तसेच ओठ दुभंगण्याच्या विकारांमुळेही चार टक्के मुलींची लग्ने होत नाहीत. या मोहिमेमुळे समाजाकडून मिळणार्‍या सापत्नभावातून सुटका होऊन अवघे जगणेच सुंदर होणार आहे, असेही आ. मुश्रीफ म्?हणाले.

यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या समन्वयक प्रज्ञा संकपाळ, डॉ. रवींद्र पाटील, डॉ. अमित माने, आयेशा राऊत, नासिर नाईक सहभागी झाले.

Back to top button