सामाजिक संवेदना कृतीतून जपा : डॉ. योगेश जाधव | पुढारी

सामाजिक संवेदना कृतीतून जपा : डॉ. योगेश जाधव

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : सामाजिक संवेदना असते. मात्र, ती कृतीतून जपली पाहिजे, असे आवाहन करत समाजाप्रती असलेली संवेदना कृतीतून घडवून आणण्याचे काम नेवगी कुटुंबीयांनी केल्याचे दै. ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी सांगितले. जिल्हा परीविक्षा व अनुरक्षण संघटनेच्या बालकल्याण संकुलाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शनिवारी ते बोलत होते. यावेळी अ‍ॅड. अभय नेवगी यांनी संकुलाच्या महिला वसतिगृहासाठी 50 लाख रुपयांची देणगी दिली. त्याचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द केला. या वसतिगृहाचे ‘कै. तिलोत्तमा सत्येंद्र नेवगी महिला वसतिगृह’ असे नामकरण करत असल्याचे संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले.

समाजात दातृत्व कमी नाही, कोल्हापुरात तर नाहीच नाही, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, सामाजिक कामासाठी एक हाक दिली तर कोल्हापुरात हजारो हात पुढे येतात. असाच दातृत्वाचा मजबूत हात अ‍ॅड. नेवगी यांनी पुढे केला आहे. दातृत्वाची कमतरता कोल्हापुरात नाही. महापूर आणि कोरोना काळात ते प्रकर्षाने दिसले. कोल्हापूरकरांना दुसर्‍या कोणाची गरज लागत नाही. जोतिबाचा विकास असो, अथवा सियाचीनमधील हॉस्पिटल असो, कोल्हापूरकरांनी त्यांच्या दातृत्वातून ते साकारून दाखवले. दातृत्वाचा वारसा अ‍ॅड. नेवगी आणि त्यांचे कुटुंबीय आजही समर्थपणे पुढे चालवत आहेत.

भविष्याचा विचार करून बालकल्याण संकुलातील विद्यार्थ्यांना संस्थेतून बाहेर पडल्यानंतरही काही अभ्यासक्रम, कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण घेता येईल का, त्याची संस्थेतच सुविधा निर्माण करता येईल का, याकरिता प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, संस्थेतून 18 वर्षांनंतर बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या राहण्याचा प्रश्न असतो. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना केवळ राहण्याची सुविधा मिळते म्हणून हॉटेल कामगार म्हणूनही काम करावे लागते. यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. बालकल्याण संकुलाच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘पुढारी’ परिवार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाहीही डॉ. जाधव यांनी दिली.

संकुलातील मुलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देता येईल का, यासाठी प्रयत्न करू, असे सांगत संस्थेचे कार्याध्यक्ष तथा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, संस्थेसाठी जे काही करता येईल, ते करण्याचा प्रयत्न राहील. चांगले शिका, मोठी स्वप्ने पाहा, कोणत्याही प्रकारचे व्यसन लागू देऊ नका.

अ‍ॅड. नेवगी म्हणाले, आपण या शहराचे देणे लागतो, असे आपली आई नेहमी म्हणत होती. ती गेल्यानंतर बालकल्याण संकुलाला देणगी देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पत्नी आणि मुलीचाही वाटा आहे. संस्थेला मदत केली; पण हा मला मिळालेला मान आहे. तो माझा सन्मानच आहे, याबद्दल मी संस्थेचा सदैव ऋणी राहीन.

संस्थेचे उपाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. विश्वस्त सुरेश शिपूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. पी. के. डवरी यांनी सूत्रसंचालन केले. मानद कार्यवाह पद्मजा तिवले यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. सहमानद कार्यवाह एस. एन. पाटील यांनी आभार मानले. संस्थेच्या मुलींनी स्वागत गीत सादर केले. शिशुगृहाच्या बालकांनी नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. दिया पोळ आणि सोनाली नूलकर या विद्यार्थिंनीनी संस्थेविषयीच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी दहावी, बारावीसह विविध परीक्षांत यशस्वी झालेल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. महिला वसतिगृहासाठी देणगी देणार्‍या कमलाकर कुलकर्णी, डॉ. सुभाष आठले, डॉ. नरेंद्र नानिवडेकर , एस. एन. पाटील, सुरेश शिपूरकर यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गिरीश खडके, अ‍ॅड. कैलाश नेवगी, गौरी नेवगी, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, विश्वस्त व्यंकाप्पा भोसले, साधना झाडबुके, निरंजन वायचळ, कुलदीप कामत, पवन खेबुडकर आदी उपस्थित होते.

Back to top button