‘मंकीपॉक्स’ची नाकेबंदी अवघड नाही! | पुढारी

‘मंकीपॉक्स’ची नाकेबंदी अवघड नाही!

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : कोरोना पाठोपाठ ‘मंकीपॉक्स’ या विषाणूने जगामध्ये दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. भारतातही या विषाणूने बाधित 4 रुग्ण आढळून आल्यामुळे त्याला प्रतिबंध करण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. विषाणू तज्ज्ञांच्या मते या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी कोरोनाप्रमाणेच सतर्क राहणे, मास्क वापरणे आणि दोन व्यक्तींमध्ये किमान शारीरिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. एवढी साधी खबरदारी घेतली, तर हे विषाणूचे संकट दूर ठेवता येणे शक्य आहे.

जगभरात सध्या ‘मंकीपॉक्स’चे 16 हजार रुग्ण आहेत. माणसाच्या थुंकीद्वारे बाहेर पडणारा हा विषाणू त्याच्या नजीकच्या व्यक्तीच्या श्वसन मार्गात गेला, की त्याला या विषाणूची बाधा होते. याखेरीज बाधित व्यक्तीच्या शरीरातील पाण्याच्या वा त्याने वापरलेले कपडे, बेडशिटस्, रुमाल याद्वारेही या रोगाचा प्रसार होण्याची शक्यता दुणावते. यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने नुकतीच जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली. या रोगाचा अटकाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून बाधित रुग्णसंख्येच्या आधारे जगातील देशांची 4 गटांमध्ये विभागणी केली.

भारतात केरळमध्ये सर्वप्रथम 3 रुग्ण आढळून आले. परदेशातील प्रवासाची पार्श्वभूमी असलेले हे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृतीही स्थिर आहे. दिल्लीमध्ये परदेशी प्रवासाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या एका 31 वर्षीय तरुणाला ‘मंकीपॉक्स’ झाल्यानंतर मात्र दिल्ली हादरली आणि केंद्रीय आरोग्य यंत्रणाही खडबडून जागी झाली.

‘मंकीपॉक्स’च्या प्रतिबंधाचे उपायही कोरोनाप्रमाणेच साधे आणि सोपे आहेत. या उपाययोजनांची गांभीर्याने अंमलबजावणी केली, तर सध्या डोके वर काढत असलेल्या कोरोनाच्या चौथ्या लाटेबरोबरच या रोगालाही हद्दीबाहेर ठेवता येणे शक्य आहे.

काय आहे ‘मंकीपॉक्स’?

आपल्याला कांजिण्या, गोवर, वारेफोड्या हे रोग आठवतात? ‘मंकीपॉक्स’ हा याच प्रजातीतील एक डीएनए व्हायरस आहे. त्याची बाधित होण्याची लक्षणेही सर्वसाधारणपणे कांजिण्या म्हणजे चिकनपॉक्ससारखीच आहेत. अंग तापाने फणफणणे आणि अंगावर रॅश उठतात. अशी लक्षणे आढळली, तर संबंधितांनी तातडीने आरोग्य यंत्रणेशी संपर्क करावा. अशा रुग्णांना लक्षणाधारित आणि चिकनपॉक्सप्रमाणेच उपचार केले जातात. फक्त या रुग्णांना अलगीकरणात ठेवले जाते.

Back to top button