कृष्णा, पंचगंगेच्या पाणी पातळीत घट | पुढारी

कृष्णा, पंचगंगेच्या पाणी पातळीत घट

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तीन इंचांनी घट झाली आहे. राजापूर बंधार्‍यातून कर्नाटककडे 96 हजार 833 क्यूसेकने विसर्ग सुरू असून 5 हजार क्यूसेकने निसर्गात घट झाली आहे.कृष्णेची पाणी पातळी 36 फूट 7 इंच तर पंचगंगेची पाणी पातळी 35 फूट 11 इंच इतकी झाली आहे.

दरम्यान, शिरढोण पुलावर पाणी पातळी कमी झाली असून पुलावर महिलांनी धुणे धुण्यासाठी गर्दी केली होती. कोयना धरणात 58.55 टीएमसी पाणी साठा झाला आहे. दोन हजार 100 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून 1858 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अंकली पुलाखालून 51 हजार 614 क्यूसेक, राजाराम बंधार्‍यातून 38 हजार 892 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राजापूर बंधार्‍याजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 36 फूट 7 इंच झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फूट 11 इंच झाली आहे.

कुरुंदवाड, नांदणी, हेरवाड, तेरवाड, घोसरवाड व शिरढोण परिसरातील शेतीत पावसाचे पाणी राहिल्याने भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक घटल्याने भाजीपाल्याच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शिरढोण, टाकवडे परिसरातील शेतकर्‍यांना शिरढोण – कुरुंदवाड पुलावर पाणी असल्याने इचलकरंजीच्या बाजारपेठेचा आधार घ्यावा लागत आहे.

Back to top button