क्षीरसागरांच्या जेवणाचे बिल द्यायचा माझा काय संबंध : आ. सतेज पाटील | पुढारी

क्षीरसागरांच्या जेवणाचे बिल द्यायचा माझा काय संबंध : आ. सतेज पाटील

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या घरच्या जेवणाचे बिल द्यायचा माझा काय संबंध, असा सवाल माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. क्षीरसागर यांनी घरी जेवायला बोलावले होते, त्या जेवणाचे बिल सतेज पाटील यांनी दिले, असा आरोप शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी कोल्हापुरात शिवसेना मेळाव्यात केला होता. त्याबाबत विचारता पाटील यांनी खा. राऊत यांचा आरोप फेटाळून लावला.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पूरस्थिती आणि व्यवस्थापन याबाबत जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी राज्य शासनावर टीका केली. राज्यातील अनेक भागात पूरस्थिती आहे. काही भागात ती वाढत आहे. पाऊसही सुरू आहे. पावसाने आतापर्यंत 100 वर बळी गेले, तरीही अशा स्थितीत राज्यात मदत आणि पुनर्वसनमंत्री नाही, हे राज्याचे दुर्देव आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.

पाटील म्हणाले, कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. पटोले आणि क्षीरसागर यांनी विधीमंडळात एकत्र काम केले आहे, त्यामुळे क्षीरसागर यांनी त्यांच्यासह आम्हा सर्वांना घरी जेवायला बोलावले होते. त्यांच्या घरच्या जेवणाचे बिल द्यायाच माझा काय संबंध.

मलाच बिल द्यायचे असते तर जेवण माझ्याकडे ठेवले नसते का, असेही पाटील यांनी सांगत शिंदे गट आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू आहे, तो त्यांचा अंतर्गत प्रश्‍न आहे, त्यावर अधिक काही बोलणे संयुक्‍तिक ठरणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले. यामुळे त्यावर बोलणे योग्य नाही. तसेच खालच्या पातळीवर होत असलेली असली टीकाही संयुक्‍तिक नसल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Back to top button