मंत्रिमंडळात विनय कोरे की प्रकाश आवाडे? | पुढारी

मंत्रिमंडळात विनय कोरे की प्रकाश आवाडे?

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या मंत्रिमंडळात जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे आणि अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यापैकी कोणाला स्थान मिळणार, याची चर्चा आहे. कोरे आणि आवाडे या दोघांनीही विधानसभेच्या निकालानंतर भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मंत्रिपद कोणाला मिळणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार, याची चर्चा सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून विनय कोरे आणि प्रकाश आवाडे यांनी सुरुवातीपासूनच भाजपला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर हे आता शिंदे गटात आहेत. त्याचबरोबर शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्राकवर हे अपक्ष निवडून आले व त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. शिवसेनेच्या कोट्यातून ते राज्यमंत्री झाले. तेही आता शिंदे गटात आहेत. त्यामुळे मंत्रिपदासाठी चुरस आहे.

आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात कोरे अपारंपरिक ऊर्जामंत्री होते. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.

इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी निवडणुकीनंतर भाजपला पाठिंबा दिला. भाजप नेत्यांशी गेल्या अडीच वर्षांत त्यांनी चांगले जुळवून घेतले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचीही मोर्चेबांधणी सुरू आहे.

कोल्हापुरातून विसर्जित मंत्रिमंडळात हसन मुश्रीफ, सतेज पाटील व राजेंद्र पाटील-यड्रावकर हे तीन मंत्री होते. आता किती आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

युती सरकारच्या काळात चंद्रकांत पाटील पालकमंत्री होते. पाटील आता पुणे येथील कोथरूड मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांचे विश्वासू म्हणून कोरे यांच्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविली जाण्याची खात्रीशीर माहिती आहे.

Back to top button