कोल्हापूर : शेण खरेदीत अडीच कोटींची फसवणूक | पुढारी

कोल्हापूर : शेण खरेदीत अडीच कोटींची फसवणूक

राशिवडे : प्रवीण ढोणे : राधानगरी आणि करवीर तालुक्यांच्या सीमेवरील गावांमध्ये नव्याने सुरू झालेल्या एका बायोगॅस प्रकल्पासाठी गोळा केलेल्या शेणासह ट्रॅक्टरचालकांची नावातच ‘हुल’ असणार्‍या या प्रकल्पाच्या प्रवर्तकाने मोठी आर्थिक फसवणूक करून हुसकावले आहे.

आर्थिक लोभापायी अनेकांनी या प्रकल्पामध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे शेतकरी, ट्रॅक्टरचालक, ग्रामदूत, तालुका डेपो एजन्सीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक झाल्याची चर्चा आहे. तर या प्रकल्पामध्ये काहींनी गुंतवणूक केली असून, त्यांचेही धाबे दणाणले आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

बायोगॅस तयार करण्यासाठी शेण खरेदीसाठी करवीर, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यांत एजंटांची नेमणूक कंपनीच्या वतीने करण्यात आली होती, तर शेण गोळा करण्यासाठी परिसरातील दोनशेहून अधिक ट्रॅक्टर भाड्याने घेण्यात आले होते. या ट्रॅक्टरचालकांकडून प्रत्येकी 11 हजार रुपये अ‍ॅडव्हान्स कंपनीने घेतला होता.

चांगले काम मिळेल या आशेने ट्रॅक्टरचालकांनी कंपनीकडे पैसे भरले. या ट्रॅक्टरमधून गोळा केलेले शेण प्रकल्पाच्या ठिकाणी एकत्रित केले जात होते. परंतु ट्रॅक्टरचालकांसह शेण विक्री केलेल्या शेतकर्‍यांचे पैसेच न दिल्याने हा गोलमाल असल्याचा अंदाज बळावला. तालुकानिहाय डेपोधारक म्हणून नेमणूक करण्यासाठी डेपोधारकांकडून 40 ते 50 लाख रुपयांची उचल केली आहे.

गावोगावी नेमणूक केलेल्या दोनशे ते अडीचशे ग्रामदूतांकडून प्रत्येकी एक हजार रुपये उकळले आहेत. देणेकर्‍यांनी कंपनीच्या रुईकर कॉलनीतील कार्यालयाकडे धाव घेतली. या प्रकल्पाकडे काम करणार्‍या वीस ते पंचवीस कर्मचार्‍यांचा पगारही या प्रवर्तकाने दिलेला नाही. शेण गोळा करणार्‍या एजंटांसह शेतकर्‍यांना या प्रवर्तकाने काही दिवसांपूर्वी प्रकल्पाच्या ठिकाणी शाही मेजवानी दिली होती. शेण देणारे शेतकरी, तालुका डेपो एजंट तसेच दोनशे ते अडीचशे ग्रामदूत, ट्रॅक्टरचालकांसह परिसरातील काही लोकांना लाखो रुपयांचा चुना लावल्याचे स्पष्ट झाले आहे.

शोधून आणून चोप?

या प्रकल्पाच्या प्रवर्तकाला कोल्हापूरहून प्रकल्पाच्या ठिकाणी आणून काहींनी चांगलाच चोप दिल्याची चर्चा आहे. त्यातून त्याने नजर चुकवून पलायन केले असून, त्याचा शोध घेतला जात आहे.

प्रवर्तकाचा दुसरा घोटाळा

नावातच ‘हुल’ असणार्‍या या प्रवर्तकाने दोन वर्षांपूर्वी साखर विक्री व्यवसायाच्या नावाखाली मोठा घोटाळा केला होता. त्यावेळी वेगवेगळ्या दैनिकांमध्ये दिलेल्या जाहिरातींची बिलेही खोटे धनादेश देऊन बुडविली आहेत.

एक रुपये किलो दराने शेणाची खरेदी

या प्रकल्पासाठी राधानगरी तालुका वगळता करवीर, गगनबावडा, पन्हाळा तालुक्यांतून एक रुपया किलो दराने शेणाची खरेदी करण्यात आली; परंतु एक रुपयाही शेतकर्‍यांना मिळालेला नाही.

शेणाव्यतिरिक्त काहीच नाही

बायोगॅस प्रकल्पस्थळी शेणाच्या ढिगाव्यतिरिक्त कोणत्याच मशिनरी नाहीत. तर प्रकल्पासाठी जमीनही भाड्याने घेतलेली आहे. त्यामुळे रक्कम कशी वसूल कसा करायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Back to top button