मनपा, जि. प. निवडणुकांचे सक्षम नियोजन करा : आ. हसन मुश्रीफ | पुढारी

मनपा, जि. प. निवडणुकांचे सक्षम नियोजन करा : आ. हसन मुश्रीफ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : राजकारणात सरकारे येत असतात आणि जात असतात, परंतु नाराज होऊन खचून न जाता नव्या ऊर्मीने काम करा, असे सांगत आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांचे सक्षमपणे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. पक्ष संघटना मजबूत करा. गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना झोपडीपर्यंत पोहोचवा, असेही ते म्हणाले.

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर कोल्हापुरात येताच माजी मंत्री मुश्रीफ यांनी शनिवारी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. जिल्हाभर राष्ट्रवादी काँग्रेसची सभासद नोंदणी मोठ्या ताकतीने करा. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष जागृत असला पाहिजे. लोकांच्या प्रश्नांची जाणीव असली पाहिजे. अन्याय होईल तिथे आंदोलन केलेच पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी तालुकानिहाय मेळाव्यांचेही नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

नव्या सरकारकडून अपेक्षा

नियमितपणे कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाची तसेच एक रुपयात दहा सॅनिटरी नॅपकिन देण्याच्या निर्णयाची नवीन सरकार अंमलबजावणी करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

बैठकीस माजी आ. के. पी. पाटील, व्ही. बी. पाटील, युवराज पाटील, संतोष पाटील, राजीव आवळे, महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने -पाटील, रणवीरसिंह गायकवाड आदी उपस्थित होते. शहराध्यक्ष आर. के. पवार यांनी स्वागत तर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी आभार मानले.

Back to top button