शाहूंचा इतिहास नव्या पिढीसमोर जाईल : सतेज पाटील | पुढारी

शाहूंचा इतिहास नव्या पिढीसमोर जाईल : सतेज पाटील

कसबा बावडा ; पुढारी वृत्तसेवा : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या ‘लक्ष्मीविलास पॅलेस’मधील संग्रहालयाचा पहिला टप्पा आजपासून बघण्यासाठी उपलब्ध करत आहोत, यामुळे महाराजांचा इतिहास चांगल्या पद्धतीने नव्या पिढीसमोर जाईल, असा विश्‍वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी शाहू जयंतीनिमित्त जन्मस्थळी अभिवादनप्रसंगी व्यक्‍त केला. शाहू महाराजांच्या जयंती निमित्त त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.

ना. पाटील म्हणाले, ‘इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक यांच्या माध्यमातून चांगले संग्रहालय तयार झाले आहे. येणार्‍या काळात संग्रहालयाचा पुढचा टप्पा पूर्ण करणार आहोत. कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने शाहू महाराजांचा समतेचा विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. सन 2024 मध्ये शाहू महाराजांची 150 वी जयंती करण्याचे नियोजन करणार आहोत. या वातावरणात समतेचा विचार, सर्वधर्मसमभावाचा विचार जो शाहू महाराजांनी दिला तो पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे’.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेले काम हे हिमालयाएवढे आहे. गोरगरीब, कष्टकरी, सामान्य, शेतकरी, मजूर सर्वांसाठी स्वतःच्या खजिन्यातून धरण बांधले हे ऐतिहासिक काम आहे. महाराजांचा स्त्री शिक्षणाचा निर्णय, वसतिगृह, कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे’.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त सकाळी आठ वाजता शाहू जन्मस्थळी पालकमंत्री पाटील व मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आयुक्‍त डॉ. कादंबरी बलकवडे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, ज्येष्ठ इतिहास संशोधक

डॉ. जयसिंगराव पवार, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील, नगरसेवक, श्रीराम सेवा संस्थेचे नूतन संचालक, शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button