कोल्हापूर : यावर्षी एकापेक्षा जास्त वेळा पूरस्थितीस तोंड द्यावे लागेल | पुढारी

कोल्हापूर : यावर्षी एकापेक्षा जास्त वेळा पूरस्थितीस तोंड द्यावे लागेल

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात यावर्षी एकापेक्षा जास्त वेळा पूरस्थितीस तोंड द्यावे लागेल, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला सादर केला. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ऑगस्ट महिन्यानंतरच होतील, अशी शक्यता आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिकांसह ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया राबविली जात आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आरक्षणासह प्रभाग रचना पूर्ण झाली आहे. मतदार यादीही तयार करण्याचे काम सुरू आहे.

या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आवश्यक तयारी पूर्ण होताच निवडणूक घेण्याचा आयोगाचा विचार आहे. मात्र, याच कालावधीत पाऊस असल्याने आयोगाने सर्व जिल्हा प्रशासनाकडून गेल्या पाच वर्षांतील नैसर्गिक आपत्तींचा अहवाल मागवला होता.

जिल्हा प्रशासनाने याबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. त्यानुसार यावर्षी जिल्ह्यात अद्याप अपेक्षेप्रमाणे पाऊस सुरू झालेला नाही. मात्र, सरासरी पावसाची किमान अपेक्षा असल्याने अतिकेंद्रित पावसाची शक्यता खूप जास्त आहे.

यामुळे कदाचित एकापेक्षा जास्त वेळा पूरस्थितीस तोंड द्यावे लागू शकते, असे अहवालात स्पष्ट केले आहे. या अहवालात गेल्या पाच वर्षांत तालुकानिहाय आलेल्या आपत्तीत, त्यात झालेले नुकसान याची तपशीलवार माहितीही सादर केली आहे.

ऑगस्ट महिन्यानंतरच बहुतांशी निवडणुका

जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसह कोल्हापूर महापालिका, नऊ नगरपालिकांना आणि 480 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. मात्र, सर्व जिल्ह्यातून आलेल्या या अहवालांचा अभ्यास करून राज्य निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम निश्चित करणार आहे. यामुळे ऑगस्ट महिन्यानंतरच बहुतांशी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, अशी शक्यता आहे.

Back to top button