आठवड्यातून दोन दिवस सायझिंग उद्योग बंद राहणार | पुढारी

आठवड्यातून दोन दिवस सायझिंग उद्योग बंद राहणार

इचलकरंजी पुढारी वृत्तसेवा : कापडाची मागणी घटल्यामुळे आणि अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे अनेक यंत्रमागधारकांनी कारखाने बंद ठेवले आहेत. त्यामुळे सायझिंगला अपेक्षित काम नाही. त्यातच सायझिंगचे दर 10 टक्क्यांनी वाढणार असल्यामुळे आठवड्यातून दोन दिवस सायझिंग बंद राहणार आहेत. वस्त्रोद्योगाच्या इतिहासात अशा प्रकारे सायझिंग बंद ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. कापड दरात वाढ आणि कापडाला अपेक्षित मागणी न मिळाल्यास भविष्यात वस्त्रोद्योग मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता आहे.

कापसाच्या तुटवड्यामुळे सूतदरात चढ-उतार होत आहेत. त्यामुळे यंत्रमागधारकांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. उत्पादन खर्च वाढत असताना कापडाला मागणी नाही. कापडाला मागणी नसल्यामुळे अपेक्षित दरही मिळत नाही, अशी स्थिती आहे. परिणामी काही यंत्रमागधारकांनी यंत्रमाग कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारखाने बंद असल्यामुळे सायझिंगला आवश्यक काम नाही.

इचलकरंजी शहरामध्ये 60 पीएलसी, तर 120 साधे सायझिंग आहेत. यामध्ये काम करणार्‍या कामगारांची संख्या पाच हजारांच्या घरात आहे. सायझिंगला अपेक्षित काम नसल्यामुळे या कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्‍नही गंभीर बनला आहे. अनेकवेळा एक किंवा दोन सटासाठी सायझिंग सुरू करणे परवडत नाही. मात्र, अनेकवेळा नाईलाजास्तव एक किंवा दोन सटासाठी सायझिंग सुरू ठेवणे भाग पडत आहे. अशा बिकट परिस्थितीत स्टार्च, लाकूड, कोळसा यांचे दर वाढत आहेत. येत्या काही काळात जवळपास दीडपट ते दुप्पट दर वाढणार आहेत. त्यामुळे सायझिंग व्यवसाय सुरू ठेवणे अडचणीचे बनले आहे.

सायझिंग व्यवसायाला अपेक्षित काम मिळत नसल्यामुळे आठवड्यातून दोन दिवस सायझिंग व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबाजवणी रविवारपासून सुरू झाली आहे. त्यामुळे रविवार, सोमवार असे दोन दिवस शहर व परिसरातील जवळपास 180 सायझिंग बंद ठेवण्यात आले आहेत. अशा प्रकारे सायझिंग बंद ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कापड मागणीत घट; अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे निर्णय

वस्त्रोद्योगातील अन्य घटकांनाही फटका

वस्त्रोद्योगात यंत्रमाग, सायझिंग, प्रोसेसिंग यांसारखे अनेक घटक काम करतात. प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून आहे. यातील एका उद्योगावर परिणाम झाला तरी त्याचे पडसाद संपूर्ण वस्त्रोद्योगात उमटतात. आठवड्यातून दोन दिवस सायझिंग बंद ठेवण्याच्या निर्णयाचा फटका वस्त्रोद्योगातील इतर घटकांनाही बसणार आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगाची साखळी खंडित होण्याची भीती वर्तवली जात आहे.

हेही वाचा

Back to top button