अजित पवारांच्या परतीचा निर्णय शरद पवारांकडे: श्रीनिवास पवार

अजित पवारांच्या परतीचा निर्णय शरद पवारांकडे: श्रीनिवास पवार
Published on
Updated on

बारामती: पुढारी वृत्तसेवा : कुटुंबापासून फारकत घेतलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना परत यायचे असेल, तर त्याचा सर्वस्वी निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे घेतील. शरद पवार यांचे मन मोठे आहे, पण अजित पवार त्यांच्याकडे जातील का?, हाही प्रश्न आहे. दोघांच्याही डोक्यात काय चाललेलय हे कळू शकत नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केले. बारामतीत विधानसभेला युगेंद्र पवार उभे राहतील का?, याचा निर्णय शरद पवार, जयंत पाटील व सुप्रिया सुळे घेतील, असेही त्यांनी सांगितले.

बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी अजित पवार यांना कानपिचक्या दिल्या. शिवाय ममत्वही दाखवले. प्रचार काळात अजित पवार यांनी कुटुंबियांवर केलेल्या टीकेवर श्रीनिवास पवार म्हणाले, अजित पवार आमच्या सगळ्यांमध्ये वयाने मोठे आहेत. मोठा भाऊ हा वडीलांसमान असतो. तो धाकट्या भावाला, बहिणीला काही बोलला ते धरून ठेवायचे नसते.

नाते बाजूला ठेवून निवडणूक लढवली

सुप्रिया सुळे यांच्या विजयाबद्दल ते म्हणाले, गेली १७ वर्षे त्या खासदार आहेत. बारामतीत त्या फार लक्ष घालत नव्हत्या. कारण येथे अजित पवार सगळे बघत होते. परंतु इतर तालुक्यात सुप्रिया यांचा संपर्क चांगला होता. मतदार त्यांना अंतर देणार नाहीत, हे आम्हाला पक्के ठावूक होते. एकाच घरात दोन पक्ष झाल्याने नात्यात निवडणूक झाली. निवडणुकीपुरते नाते बाजूला ठेवूनच आम्हाला ही निवडणूक लढावी लागली. प्रचार काळात शरद पवार, सुळे यांनी कोणाचाही उल्लेख केला नाही, ते फक्त कामांवर आणि प्रश्नांवर बोलत राहिले. अजित पवार भावनिकतेवर बोलले, पण आम्ही तसे बोललो नाही. मतदार सूज्ञ असतो. ते बघत असतात, ऐकत असतात. या पदासाठी कोण योग्य याचा निर्णय जनतेने घेतला. नेतेमंडळी तिकडे होती, परंतु सामान्य जनता आमच्यासोबत होती. त्यांना आमदारकीला मत दिले म्हणजे जनता दावणीला बांधली असे होत नाही. जनतेचे स्वतंत्र मत असते. राजकारण हे 'बॅलन्स शिट' नाही असेही श्रीनिवास पवार यांनी सांगितले.

भाजपसोबत अजित पवार गेल्याचे जनतेला आवडले नाही का?,  या प्रश्नावर ते म्हणाले. अजित पवार गेली अनेक वर्षे राजकारणात आहेत. त्यांचेही काही आडाखे असतील, त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला असेल. भाजपने अजित पवार यांचा घात केला का?, या प्रश्नावर ते म्हणाले, पराभव झाला म्हणून दुसऱ्याला दोष देणे चुकीचे आहे. प्रत्येकाने आत्मपरीक्षण केले पाहिजे. विजयासाठी अनेकजण पुढे येतात, तशी पराजयाचीही जबाबदारी घेतली पाहिजे.

युगेंद्रची चर्चा पण निर्णय वरिष्ठांकडे

अजित पवारांविरोधात काम केल्याने मीडियाचा फोकस युगेंद्रकडे गेला आहे. त्यामुळे विधानसभेसाठी त्यांचे नाव चर्चेत आहे. इथे तिकिट कोणाला द्यायचे याचा निर्णय शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे घेतील. आम्ही त्यांचे काम करू, असे श्रीनिवास पवार म्हणाले.

चंद्रकांत पाटील चावी मारून गेले

प्रचाराच्या सुरुवातीला मंत्री चंद्रकांत पाटील बारामतीत येवून शरद पवारांबद्दल बोलून गेले. त्यांनी अजित पवारांची खोडी काढली. अजित पवारांनी त्यांचे वेगळे नाव ठेवल्याने त्यांनी ही खोडी काढली असावी, पण ते बारामतीत आले आणि चावी मारून गेले, हे खरे असल्याचे श्रीनिवास पवार म्हणाले.

राजकारणात कुटुंब पाहिले जात नाही

राजकारणातील लढाई ही जिंकण्यासाठी असते. तेथे कुटुंब पाहिले जात नाही. आपल्याला लढायचे आहे आणि जिंकायचे आहे, याच भावनेने काम करावे लागते. आम्ही तेच केले. शरद पवार यांच्यावर लोकांची निष्ठा, प्रेम आहे. त्यातून सुप्रिया सुळे यांचा विजय साकारला, असे मत शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी व्यक्त केले.

शरद पवारांच्या विचारांमुळे विजय: राजेंद्र पवार

सुप्रिया सुळे यांनी केलेल्या कामांमुळे त्यांचा विजय झाला. आमदार रोहित पवार यांनी झंझावाती प्रचार केला. त्यातून तरुणाई जागृत झाली. सामान्य जनता दबलेली होती. त्यांचा आवाजाला मोकळीक मिळाली. याचा परिणाम मताधिक्यात झाला. अजित पवार यांनी विकास केला, विशेषत: बारामती शहरात तो केला. पण त्यांनी जे काम केले आहे, तो विकास आहे का, लोकांना तो मान्य आहे का, तो लोकांच्या उपयोगी पडतो आहे का, याचा विचार त्यांनी लोकांशी बोलून करायला हवा होता, असेही ते म्हणाले. मी राजकारणात येणार नाही. विधानसभेसाठी वरिष्ठ जो उमेदवार देतील, त्याचे काम करू, असे ते म्हणाले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news