कोल्हापूर : घरातील कचरा चौकात अन् कोंडाळा रस्त्यावर! | पुढारी

कोल्हापूर : घरातील कचरा चौकात अन् कोंडाळा रस्त्यावर!

कोल्हापूर ; एकनाथ नाईक : दाटीवाटीची लोकवस्ती, अरुंद रस्ते, जुनी ड्रेनेज लाईन, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, स्ट्रीट लाईटअभावी अंधार, काही प्रॉपर्टी कार्डचा रखडलेला प्रश्न, ‘घरातील कचरा चौकात अन् कोंडाळा रस्त्यावर’, अशी स्थिती येथे आहे. दुर्गंधीयुक्त कचर्‍यामुळे तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभर बनला आहे. या परिसरातील कोंडाळे ओसंडून वाहू लागले आहेत. याचे गांभीर्य कोणालाच नाही. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

महानगरपापिका निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचना अमलात आली आहे. संभाजीनगी बसस्थानक टिंबर मार्केट, राजाराम चौक, पाण्याचा खजिना, नाथागोळे तालीम, खरी कॉर्नर, गांधी मैदान, शहाजी वसाहत मिळून प्रभाग 21 तयार केला आहे. या प्रभागाची लोकसंख्या 17 हजार 412 इतकी आहे. अजूनही हा प्रभाग काही प्राथमिक नागरिक सुविधांपासून वंचित राहिला आहे. मंगळवार पेठ आणि शिवाजी पेठेतील काही भाग यामध्ये समाविष्ठ आहे. मिरजकर तिकटीकडून संभाजीनगरकडे जाणार्‍या रस्त्याचे पॅचवर्क सुरू आहे. जरग गल्ली येथे कचरा पडून आहे. रामगल्ली, सिद्धाळा गार्डन परिसरात अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. सनगर गल्लीतही अशी परिस्थिती आहे.

सिद्धाळा गार्डन, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल परिसर स्ट्रीट लाईट अभावी अंधारात असतो. या परिसरात मुतार्‍या आहेत, पण औषध फवारणी आणि स्वच्छतेचा अभाव आहे. त्यामुळे दुर्गंधीने ये-जा करणार्‍या नागरिकांचा श्वास कोडतोय. नंगीवली चौक, सिद्धाळा गार्डन, बजापराव माने तालीम, जरग गल्ली, संभाजीनगर रेस कोर्स नाका परिसरात भटक्या कुत्र्याचा उपद्रव वाढला आहे. घोळक्यांनी येथे कुत्री वावरतात. रात्री-अपरात्री वाहनांचा पाठलाग देखील ही कुत्री करतात.

परिसरातील पेटाळा मैदानाशेजारून ड्रेनेजच्या पाईप गेल्या आहेत. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्याने मैदानाला तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. औषध फवारणी होत नाही, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.चाणक्य कॉर्नर, कोल्हापूर हायस्कूल, पेटाळा मैदानाच्या पश्चिम दिशेला रस्त्यावर कोंडाळा भरून वाहत असून कचरा रस्त्याच्या मध्यभागी आला आहे. येथेच बंद पडलेल्या काही जुन्या गाड्या एका मागे एक अशा लावून ठेवल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

सिद्धाळा उद्यानामधील फूटपाथ वरील फरशा उखडल्या आहेत. उद्यानात तण वाढले आहे. पाऊस आणि वार्‍यामुळे उद्यानातील झाड उन्मळून पडला आहे. कचरा उठावासाठी असणार्‍या तीन चाकी सायकली येथे सडत पडल्या आहेत. कदम खणी भोवती खर मातीचे मोठे ढीग साचले आहे. खणीभोवती अतिक्रमणाचा विळखा देखील घट्ट झाला आहे. इंदिरा सागर पेट्रोल पंपाच्या मागील बाजूचा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. या रस्त्यावर देखील कचर्‍याचे साम—ाज्य आहे.

प्रभागातील इच्छुक : सचिन चव्हाण, सुनंदा मोहिते, स्वप्नील पाटील, रवी आवळे, पांडुरंग आडसूळ, सचिन आडसूळ, रामदास भाले, कपिल सकटे, प्रसाद जाधव, महेश सावंत, निलांबरी साळोखे, चंद्रमोहन पाटील, सिद्धी रांगणेकर, चेतन मोहिते, चंद्रकांत चिले, सचिन मांगले, गणेश चिले, पांडुरंग आडसूळे, रामचंद्र भाले, शिवाजीराव ढवण, अक्षय पोवार, युवराज साळोखे, अशोक पाटील, सुनील मुळीक, महेश पाटील.

प्रभाग क्रमांक 21 ची व्याप्ती…

संभाजीनगर बस स्थानक, टिंबर मार्केट, कदम खण, राजाराम चौक, गंजीमाळ परिसर, पाण्याचा खजिना, नाथागोळे तालीम, पद्माराजे हायस्कूल, गांधी मैदान, खरी कॉर्नर, सिद्धाळा गार्डन, मंगळवार पेठ परिसर, शहाजी वसाहत, विजयनगर.

Back to top button