एज्युदिशा-2022 : उदंड प्रतिसाद… | पुढारी

एज्युदिशा-2022 : उदंड प्रतिसाद...

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षणानंतर दोन वर्षांनंतर होत असलेल्या दै. ‘पुढारी’ एज्युदिशा शैक्षणिक प्रदर्शनास रविवारी सुट्टीच्या दिवशी उदंड प्रतिसाद लाभला. विविध नामवंत शैक्षणिक संस्थांच्या सहभागाबरोबरच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांनी प्रदर्शन दिवसभर हाऊसफुल्ल होते. शिक्षण व करिअरच्या संधीबाबत विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे निरसन झाले. करिअरच्या नव्या दिशा शोधण्याचे व्यासपीठ मिळाल्याची भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

दै. ‘पुढारी’ आयोजित व संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘एज्युदिशा-2022’ शैक्षणिक प्रदर्शन ताराराणी विद्यापीठाच्या व्ही. टी. पाटील मेमोरियल हॉलमध्ये सुरू आहे. एज्युदिशा प्रदर्शनाचे पॉवर्ड बाय स्पॉन्सर आयआयबी-पीसीबी, लातूर आहेत. सहयोगी प्रायोजक एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी पुणे व प्रा. मोटेगावकर सरांचे आरसीसी क्लासेस, लातूर आहेत. अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, पुणे व सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे हे सहप्रायोजक आहेत.

प्रदर्शनाच्या उद्घाटनापासूनच विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळाली. रविवारी सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी पालकांसह प्रदर्शनाला भेट दिली. कुणी पालक तर कुणी मित्रांसमवेत प्रदर्शनस्थळी येऊन प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलवर जाऊन विविध कोर्सेस, चांगल्या महाविद्यालयांची माहिती घेतली. प्रत्येक स्टॉलवर तज्ज्ञ मार्गदर्शकांनी त्यांचे स्वागत करीत सर्व कोर्सेसची माहिती दिली. शिक्षणात कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत, मेडिकल, इंजिनिअरिंग, इतर कोर्सेस, व्यावसायिक अभ्यासक्रम, परदेशी शिक्षणाच्या संधी, जॉबच्या संधी यासह अन्य प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना एकाच छताखाली मिळाल्याने शिक्षण व करिअर निवडीचा संभ्रम असलेल्या विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळाली.

प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस…
येत्या काही दिवसांतच नवीन शैक्षणिक सत्रास प्रारंभ होणार आहे. दहावी-बारावीसह पदवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा निकालाची धास्ती व करिअरच्या पुढील प्रवासाची उत्सुकता लागली आहे. दै.‘पुढारी’ एज्युदिशा प्रदर्शनाच्या माध्यमातून करिअरच्या विविध नव्या वाटांची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली आहे. याचा लाभ घेण्याची शेवटची संधी उपलब्ध आहे. सोमवारी (दि.30) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असणार आहे.

Back to top button