पाखरांनाही लागते मान्सूनची चाहूल | पुढारी

पाखरांनाही लागते मान्सूनची चाहूल

कोल्हापूर; कृष्णात चौगले : मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. येत्या काही दिवसांत तो महाराष्ट्रात येईल. बळीराजाची शेतकामांची धांदल सुरू आहे. निसर्गातही मान्सूनचा सांगावा देणारे वर्षादूत त्याला कामाच्या व्यापात फार मोठा आधार ठरत असतात. निसर्गातील काही घडामोडी घडायच्या अगोदर मुक्या जीवांना अगोदर कळतात. त्याची चाहूल ते आपल्या कृतीतून देत असतात. काही पशुपक्ष्यांना त्यांच्या जन्मजात या बाबी मिळालेल्या असतात. पावसाची चाहूल सांगणारे आणि खात्रीने त्याची सूचना देणारे पक्षी वर्षादूत म्हणून ओळखले जातात. यातील काही पक्ष्यांची ओळख करून देताना त्यांच्याकडून येत असलेल्या संकेतांची माहिती अभ्यासकांनी नोंदवली आहेत. काही निरीक्षणे ही निसर्गचक्राची ओळख करून देणारी आहेत.

चातक पक्षी : आफ्रिकेतून येणारे चातक पक्षी पावसाचा अंदाज अगदी अचूक देतात. पाऊस वेळेवर येणार असेल तर या पक्ष्यांचे आगमन लवकर होते. त्यांना यायला उशीर झाला तर पावसाचे आगमनही लांबते, अशी ही मान्सूनची नैसर्गिक वाटचाल थक्क करणारी आहे.

पावशा पक्षी : बळीराजा आणि निसर्ग यातील महत्त्वाचा दुवा म्हणून याची नोंद घेतली जाते. पावशा पक्षी ओरडू लागला की ‘पेरते व्हा’, असा संदेश शेतकर्‍यांपर्यंत जातो आणि तो मशागतीची कामे सुरू करतो.

तित्तीर पक्षी : शेतात, माळरानात अंगावर काळ्या-पांढर्‍या रंगाचे ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे सांकेतिक स्वरात ओरडू लागले, की आता हमखास पाऊस येणार, असे समजावे.

वादळी पक्षी : वादळी पक्षी किनार्‍याच्या दिशेने येऊ लागले की पाऊस पडणार याचे नक्की संकेत मिळतात. त्यावेळी मच्छीमार आपल्या बोटी, जहाजे समुद्रात नेत नाहीत.

कावळ्याचे घरटे : कावळा आपले घरटे पावसाच्या अंदाजाने बांधतो. मे महिन्याच्या काळात बाभूळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्यावर्षी पाऊस चांगला असतो. कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेला घरटे केले, की पाऊस चांगला आणि पश्चिमेला केले, तर सरासरीएवढा पडणार, असे संकेत आहेत.

खेकडे : तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसले, तर त्यांच्या मार्गात पूर्वसूचना असते. त्यांच्या समुद्राकडे जाण्याने बळीराजाला पावसाचे संकेत मिळतात.

काळ्या मुंग्या : हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार, हे समजावे. अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरून पावसाचे अंदाज बांधले जात आहेत.

वाळवी : झाडे पोखरणार्‍या वाळवीला कधी पंख फुटत नाहीत. मात्र, पावसाळ्यापूर्वी वारुळातून थवेच्या थवे हजारांच्या संख्येने बाहेर पडू लागले की, पावसाचे लवकर आगमन होते. पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी वाळवीचे पंख फुटलेले थवे उडून एकमेकांशी समागम करतात. त्यातून त्यांच्या नंतरच्या पिढ्या तयार होतात.

मासे : पहाडी, डोंगरी भागातील माशांच्या अंड्यांतील पिले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात, तेव्हा तो काळ पाऊस संपण्याच्या उत्तर नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार, याची सुस्पष्ट कल्पना माशांच्या या जीवनचक्रातून मिळते.

दुष्काळ, कमी पावसाचे संकेत

बिब्ब्याच्या झाडाला बहर येणे, हे दुष्काळाचे संकेत मानले जाते. खैर आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्यावर्षी पाऊस कमी पडतो. कवठाला आलेला फुलांचा बहर वादळवार्‍याचे संकेत देतो. बिचुलाचा बहर आणि कुटजाचा बहर तर अतिवृष्टीची हाक देतो. वेलींचे तंतू अगदी काटकोनात, सरळ रेषेत उभे राहताना दिसू लागले तर ते चांगल्या पावसाचे लक्षण समजावे.

Back to top button