कोल्हापूर : घळभरणीचे काम बंद पाडण्यावरून उचंगी धरणग्रस्त व पोलिसांत झटापट | पुढारी

कोल्हापूर : घळभरणीचे काम बंद पाडण्यावरून उचंगी धरणग्रस्त व पोलिसांत झटापट

आजरा; पुढारी वृत्तसेवा : आजरा तालुक्यातील उचंगी धरणग्रस्तांनी विविध प्रलंबित मागण्यांबाबत धरणाच्या कार्यस्थळावर मोर्चा काढून सोमवारी घळभरणीचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी धरणग्रस्त व पोलिस यांच्यात जोरात झटापट झाली. प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांनी काही प्रलंबित प्रश्नांबाबत पत्र दिल्यानंतर पुन्हा एकदा धरणग्रस्तांनी आपले आंदोलन स्थगित केले.

धरणग्रस्तांच्या मागण्यांबाबत बावीस वर्षे लढा सुरू आहे. सध्या घळभरणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून धरणग्रस्त आक्रमक झाले आहेत. आपल्या मागण्यांसाठी धरणग्रस्त सोमवारी चाफवडे येथून मोर्चाने धरणाच्या कार्यस्थळाकडे निघाले. चाफवडे गावाजवळ सुरू असलेले माती काढण्याचे काम त्यांनी बंद पाडत मशिनरीसह ऑपरेटरना पिटाळून लावले.

जोपर्यंत आपल्या मागण्यांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत धरणाच्या घळभरणीचे काम करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत ते घळभरणीच्या ठिकाणी निघाले. धरणाच्या परिसरात कलम 144 लागू असल्याने पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडविले. यावेळी पोलिस व धरणग्रस्तांमध्ये जोरदार झटापट झाली. यात धरणग्रस्त महिला आक्रमक झाल्या होत्या.

‘दादागिरी नही चलेगी..’, ‘फसवणूक करणार्‍या प्रशासनाचा धिक्कार असो’, ‘जलसंपदाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या करा…’, अशा घोषणांनी परिसर दणाणूण गेला. जोपर्यंत प्रलंबित प्रश्नांबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत धरणाचे काम बंद ठेवण्याची मागणी धरणग्रस्तांनी केली. यामुळे प्रशासनाने धरणाचे काम काही वेळासाठी बंद ठेवले.

प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांनी धरणग्रस्तांशी चर्चा करताना 150 घरांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगितले. जलसंपदा विभागाचे अभियंता विजय राठोड यांनी उजव्या तीरावरील रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. कॉ. संजय तर्डेकर यांनी या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास नुकसान होणार्‍या शेतकर्‍यांना भरपाई देण्याची मागणी केली. 15 मे पर्यंत जमिनीचे सपाटीकरण करून देण्याचे प्रशासनाच्या वतीने मान्य करण्यात आले. याबाबतचे पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी तहसीलदार विकास अहिर, नायब तहसीलदार डी. डी. कोळी, दत्तात्रय बापट, दादासाहेब मोकाशी, प्रकाश मणकेकर, निवृत्ती बापट व धरणग्रस्त उपस्थित होते. उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, स.पो.नि. सुनील हारूगडे, पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव उपस्थित होते.

रस्त्याच्या ठेक्यावरून कोल्हापूर-सांगलीच्या मंत्र्यांमध्ये वाद

धरणाच्या उजव्या तीरावरच्या रस्त्याच्या ठेक्यावरून कोल्हापूर व सांगलीच्या मंत्र्यांमध्ये वाद सुरू असल्यानेच काम रखडले आहे. पाणी अडवून काही राजकारणी मंडळी आपला राजकीय हेतू साध्य करू पाहत आहेत. प्रशासन फक्त चर्चेत गुंतवून पुनर्वसनाच्या प्रश्नाकडे डोळेझाक करीत असल्याचे कॉ. अशोक जाधव यांनी सांगितले.

Back to top button