भगव्याच्या रक्षणासाठी भाजप मैदानात : देवेंद्र फडणवीस | पुढारी

भगव्याच्या रक्षणासाठी भाजप मैदानात : देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : सातपैकी पाच निवडणुकांत कोल्हापुरात शिवसेना विजयी झाली. अपघाताने गेलेली जागा परत मिळविण्यासाठी आणि भगव्याच्या रक्षणासाठी भाजप मैदानात उतरल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भाजपला साथ द्या व भगव्याचे रक्षण करा, अशी साद त्यांनी घातली.

उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. पेटाळा मैदानावर ही सभा झाली. येथील ताराराणी चौकातील फलकांवर बाळासाहेब ठाकरे यांचा दिमाखदार फोटो होता. आज त्याच फोटोशेजारी सोनिया गांधी यांचा फोटो व पंजाचे चिन्ह पाहायला मिळाले. तेथे हिंदुत्वाचे नामोनिशाणही दिसत नाही. कोल्हापूर उत्तरने कायम भगव्या झेंड्याला भक्कम पाठिंबा दिला. आता भगव्याची अ‍ॅलर्जी असणार्‍यांच्या ते पाठी लागलेत, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.

कोल्हापूर भगवेच राहिले पाहीजे. आता जर चुकलो तर पुन्हा भगव्याचे दर्शन होणार नाही. आमचा त्या माऊलीस विरोध नाही. पण त्या माऊलीच्या मागे दडलेल्या पालकमंंत्र्यांशी आमची लढाई आहे. आज माऊलीस समोर केले आहे. माऊलीच्या नावावर जागा जिंकल्यास 2024 मध्ये पालकमंत्री या ठिकाणचा उमेदवार असेल. पुन्हा एकदा भगव्यास विरोध करण्यास काँग्रेसचा पंजा घेउन तो लढताना दिसेल, अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले.

सगळे सरकारच शंभर कोटीच्या वसुलीत मस्त आहेत. स्वत: वसुली करणार्‍याकडून सुरक्षेची अपेक्षा काय हमी मिळणार, असा सवाल करून फडणवीस म्हणाले की, जनता मैदानात उतरल्यास तुम्हाला शिल्लक ठेवणार नाही. सामान्य माणसांवर चालविलेला दंडुका कसा मोडायचा आम्हाला माहित आहे.

राज्यात सरकार नाही भ—ष्टाचार आहे. कोरोना काळात सामान्य माणूस होरपळत असताना सरकारला मात्र दारुवाल्यांचा पुळका आला. त्यांना परवाना शुल्कात पन्नास टक्के सवलत दिली. मात्र या सरकारमध्ये इंधनावरील कर कमी करण्याची हिंमत आहे का? भाजपशासीत सरकारने जे केले ते यांनी करून दाखवावे, असे आवाहन त्यांनी केले.

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले मात्र 20 टक्के निधीही नाही सर्व बजेट राष्ट्रवादीने पळविले. काँग्रेसला उरले सुरले शिवसेनेस टाळ भजन करीत बसा, असेही ते म्हणाले.

विरोधी पक्षाचा आमदार झाल्यास काय करणार, असे विचारणार्‍या पालकमंत्र्यानी काय दिवे लावले. असा सवाल करुन फडणवीस म्हणाले, तुम्ही लादलेला टोल काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील यांना यावे लागले. पालकमंत्र्यांनी सर्वात पहिली टोलची पावती फाडल्यानंतर कोल्हापुरात नव्याने सुर्याजी पिसाळ निर्माण झाल्याची टीका एन. डी. पाटील यांनी केली होती. भाजपने 550 कोटीं रुपये देऊन कोल्हापूरला टोलमुक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

पाणीपुरवठा योजना, विमानतळ हे प्रश्न चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने मार्गी लागले. विमानतळ विस्तारीकरणासाठी 250 कोटींच्या फाईलवर रस्त्यात सही घेतली. रेल्वे, महामार्ग गडकरी यांनी मार्गी लावले, असे सांगून ते म्हणाले, पंचगंगेचे पाणीही निर्मळ होऊ शकते आणि ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात. 1 हजार 400 कोटी रुपयांचा आराखडा आता अंतिम टप्प्यात आहे. तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही पंचगंगा प्रदूषण मुक्त करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

कोल्हापूरमध्ये सुटलेला आहे थंडगार वारा 12 तारखेला वाजवून टाका काँग्रेसचे बारा, अशा लालीत्यपूर्ण शैलीत आपल्या भाषणाला सुरवात करत केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले म्हणाले, ज्या काँग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत केले त्या काँग्रेसला धूळ चारा.

गेल्या विधानसभा निवडणूकीत जनतेने भाजप शिवसेनेला कौल दिला होता. पण मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी शिवसेनेने धोका दिल्याचे ते म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, दडपशाही करून मते मागणार्‍यांना जनता त्यांची जागा दाखवेल. कसबा बावड्यातील मतदार मोठ्याप्रमाणात भाजपच्या पाठीशी आहेत. त्यामुळे निवडणूक निकाल काय लागणार हे या सभेतूनच स्पष्ट होईल.

उमेदवार सत्यजित कदम यांनी कोल्हापूरच्या विकासात भाजपचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले. भाजप सरकारने कायम जनतेचे हित पाहून निर्णय घेतले असून भाजपलाच साथ द्या, असे आवाहन केले. यावेळी आ. विनय कोरे, प्रकाश आवाडे, सदाभाऊ खोत, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, चित्रा वाघ, माजी खा. धनंजय महाडीक, सुरेश हळवणकर, शौमिका महाडीक, महेश जाधव आदींची भाषणे झाली.

सभेला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, संजय काका पाटील, आ.चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, माजी आ. हर्षवर्धन पाटील, अमल महाडीक, शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, राहूल चिकोडे आदी उपस्थित होते.

Back to top button