कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणात नाल्यांचा मोठा हातभार | पुढारी

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणात नाल्यांचा मोठा हातभार

कोल्हापूर ; आशिष शिंदे : प्रदूषण रोखण्यात जिल्हा प्रशासनाला अपयश आल्याने पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्‍न दिवसागणिक गंभीर बनत चालला आहे. पंचगंगा प्रदूषणाला शहरातून मिसळणार्‍या नाल्यांचा मोठा हातभार लागत आहे. कसबा बावड्यातील एक नाला सर्वाधिक प्रदूषित असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून समोर आले आहे. जामदार क्लब नाला आणि राजाराम बंधार्‍याजवळील नाल्यातून दररोज हजारो लिटर मैलामिश्रित व दूषित सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे.

नदीमध्ये मिसळणार्‍या सहा नाल्यांच्या पाण्याचे नमुनेे एमपीसीबीकडून घेण्यात आले होते. याबाबतचा धक्‍कादायक अहवाल समोर आला आहे. राजाराम कारखान्याची पाईपलाईन अपघाताने लिकेज झाली होती. त्या ठिकाणावरील नाल्याच्या पाण्यातील सॅम्पलमध्येच सर्वाधिक प्रदूषणाचा टक्‍का मिळाला आहे. राजाराम बंधार्‍यात मिसळणारा नाला, सीपीआर नाला, जामदार क्लब नाला, दुधाळी नाला थेट नदीपात्रमध्ये मिसळत राहिल्यास नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे.

पंचगंगा घाटावरील पाण्याची गुणवत्ता उत्तम असल्याचे एमपीसीबीच्या अहवालात सांगण्यात आले आहे. याचवेळी नदीमध्ये नाले मिसळणार्‍या ठिकाणावरुन घेण्यात आलेल्या पाण्याचे नमुणे अनेक पटीने प्रदूषीत होते.

नाल्यांमधून होणार्‍या प्रदूषणामुळेच नदीपात्रातील जलचरांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. पाईपलाईन लीकेजच्या बाजूला असलेल्या नाल्यामधील पाण्याचा बायॉलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) 280 तर केमिकल ऑस्किजन डिमांड (सीओडी) 872 एमजी प्रती लीटर इतका होता. हे प्रमाण जलचरांसह मानवी आरोग्यासाठी धोकादायक मानला जातो.

पंचगंगा प्रदूषण करणारे नाले

पंचगंगा घाट : पीएच 7.6, टीडीएस 124, सस्पेंडेड सॉलिड्स 16, बीओडी 2.1, सीओडी 22.4, सल्फेट 3.17, क्लोराईड 7.35

जामदार क्लब नाला : पीएच 7, टीडीएस 386, सस्पेंडेड सॉलिड्स 62, बीओडी 30, सीओडी 73, सल्फेट 32, क्लोराईड 50.88

राजाराम बंधार्‍यात मिसळणारा नाला : पीएच 7.1, टीडीएस 504, सस्पेंडेड सॉलिड्स 42, बीओडी 35, सीओडी 63, क्लोराईड 63.28, सल्फेट 21

पाईप लिकेजजवळील नाला : पीएच 6.1, टीडीएस 812, सस्पेंडेड सॉलिड्स 62, बीओडी 280, सीओडी 872, क्लोराईड 45.24, सल्फेट 153, ग्रीस 3.6

Back to top button