शिवाजी विद्यापीठास 4.27 कोटींचा निधी | पुढारी

शिवाजी विद्यापीठास 4.27 कोटींचा निधी

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठात नॅनो-जैवतंत्रज्ञान व कॅन्सरवरील संशोधनास लागणार्‍या सुविधांसाठी भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या बिल्डर (डीएसटी-बिल्डर) योजनेंतर्गत 4.27 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील 2.85 कोटी रुपयांचा निधी नुकताच प्राप्‍त झाला आहे. यामुळे नॅनो-जैवतंत्रज्ञान व कर्करोगविषयक संशोधन प्रकल्पाला चालना मिळणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विद्यापीठातील चार संशोधकांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागास गेल्यावर्षी सादर केलेला प्रकल्प मंजूर झाला आहे. यातून नॅनो-जैवतंत्रज्ञान व कर्करोगावरील संशोधनाची आधुनिक, सुसज्ज प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील पंचवार्षिक प्रकल्पाचे समन्वयक आहेत. प्रकल्पांतर्गत सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे डॉ. के. डी. सोनवणे, नॅनो सायन्स व तंत्रज्ञान विभागाचे डॉ. के. डी. पवार, वनस्पतिशास्त्र विभागाचे डॉ. एम. एस. निंबाळकर प्रमुख अन्वेषक आहेत.

प्रकल्पांतर्गत विविध धातू, विविध आकाराचे नॅनो पार्टिकल्स तयार करणे व त्यांचे भौतिक गुणधर्म तपासणे याविषयी संशोधन केले जाईल. जीवाणू, विषाणू, वनस्पती व कवक यांच्यामधील नॅनो तंत्रज्ञानाच्या उपयुक्‍ततेबाबत संशोधन होणार आहे.

पश्‍चिम घाटातील विविध वनस्पतींचा नॅनो पार्टिकल्स तयार करण्यासाठी व त्यांच्या औषधी व शेतीपूरक वापराचे संशोधन होईल. बायोइन्फॉर्मेटिक्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नॅनो कण व नॅनो मटेरिअल यांची प्रक्रिया करून नॅनो पार्टिकल्सच्या सजीव पेशींवर होणार्‍या परिणामांविषयी चाचण्या करून निष्कर्ष पडताळणी होईल.

* संशोधनामुळे विविध सजीवांच्या उपयुक्‍त नॅनो कणनिर्मितीसाठीच्या उपयोजनांची माहिती मिळेल. नॅनो कण बनविणार्‍या जीवाणूंचा शोध, नॅनो कण व नॅनो मटेरिअलचा कर्करोग, न्यूरोसायन्स, अल्झायमर, टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी व रीलिज, कृषी क्षेत्रासाठी उपयुक्‍त नॅनो मटेरिअल, नॅनो पेस्टिसाईड या अनुषंगाने संशोधन केंद्रित असणार आहे.

Back to top button