कोल्हापूर खंडपीठासाठी मुख्य न्यायमूर्तींना तत्काळ पत्र | पुढारी

कोल्हापूर खंडपीठासाठी मुख्य न्यायमूर्तींना तत्काळ पत्र

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करावे, याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. यासंदर्भात आपण आजच उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना पत्र देत आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिली. ते सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीत बोलत होते.

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन व्हावे, यासाठी कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांत 38 वर्षांपासून प्रदीर्घ लढा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री ठाकरे यांची विधानभवन येथे भेट घेतली.

पक्षकारांचा वेळ व पैसा वाचेल

कोल्हापुरात खंडपीठाच्या स्थापनेसाठी प्रदीर्घ लढा सुरू आहे. 17 हजारांवर वकील, पक्षकारांसह सामाजिक संघटना यामध्ये उत्स्फूर्तपणे उतरले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात या परिसरातील हजारो खटले प्रलंबित आहेत. कोल्हापुरात खंडपीठ स्थापन झाल्यास पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचेल, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.

सर्वसामान्यांच्या भावना तीव्र

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी प्रदीर्घ लढा सुरू आहे. सर्वसामान्यांच्या भावना तीव— आहेत. खंडपीठ झाल्यास पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लागेल. समाजातील सर्वच घटक खंडपीठासाठी आग्रही आहेत, असे पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले.

कोल्हापूर सांगलीसह 6 जिल्ह्यांतील पक्षकार, वकील आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन खंडपीठाबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. यासंदर्भात आजच मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना पत्र देत आहोत. खंडपीठासाठी पाठपुरावा करण्यात येईल, अशीही ग्वाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली

या शिष्टमंडळात मंत्री सर्वश्री हसन मुश्रीफ, अनिल परब, उदय सामंत, विश्वजित कदम व शंभूराज देसाई, आमदार सर्वश्री शशिकांत शिंदे, प्रकाश आबिटकर, अरुण लाड, ऋतुराज पाटील यांच्यासह सहा जिल्ह्यांतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा समावेश होता.
मुख्य न्यायमूर्तींशी उद्या चर्चा कोल्हापूर खंडपीठ स्थापनेच्या अनुषंगाने कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे पदाधिकारी गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची भेट घेणार आहेत.

Back to top button