कोल्हापूर :आरोग्य विभागातील ‘त्या’ कर्मचार्‍यांवर कारवाई करा | पुढारी

कोल्हापूर :आरोग्य विभागातील ‘त्या’ कर्मचार्‍यांवर कारवाई करा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा :  सूचना देऊन देखील कामाची पूर्तता न करणार्‍या संबंधित कर्मचार्‍यांवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिल्या आहेत. निलंबन, चौकशी असे या कारवाईचे स्वरूप असणार आहे. यामुळे आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने दि. 24 जानेवारी रोजी आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सीईओ चव्हाण यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली होती. 2019 पासून प्रलंबित असलेल्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेची प्रकरणे निर्गमित करावीत, वैद्यकीय बिले त्वरित मिळावीत, त्यांची पदोन्नती करावी व पदस्थापना समुपदेशन पद्धतीनेच द्यावी, शासनाकडून आलेल्या कोव्हिड योद्धा प्रमाणपत्रांचे सन्मानाने वितरण करावे, आदी मागण्यांचा त्यात समावेश होता.

पंधरा दिवसांत निर्णय न झाल्यास कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. यावेळी सीईओ चव्हाण यांनी बहुतांशी प्रश्न स्थानिक पातळीवरील असल्याने ते मार्गी लावण्याच्या सूचना जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांना दिल्या होत्या. परंतु, आजअखेर त्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी सीईओ चव्हाण यांची दुपारी भेट घेतली.

यावेळी त्यांनी पदोन्नतीची प्रकरणे अद्याप तयार करण्यात आलेली नाहीत, भविष्य निर्वाह निधीची प्रकरणे तशीच प्रलंबित आहेत, स्थायित्वाचा लाभ, मेडिकल बिले या संबंधित कोणतीही प्रगती झाली नसल्याचे सांगितले. यावर सीईओ चव्हाण यांनी दोन दिवसांत निश्चितपणे प्रश्न मार्गी लागतील, असे आश्वासन दिले.

शिष्टमंडळात संघटनेचे महासचिव एम. एम. पाटील, जिल्हा महासचिव एम. एम. भाट, कार्याध्यक्ष अल्ताफ शेख, सचिव प्रवीण मुळीक, महादेव घोडके यांचा समावेश होता. त्यानंतर चव्हाण यांनी सूचना देऊनही ज्यांनी कामांची पूर्तता केली नाही, ज्यांच्या कामात प्रगती नाही, त्या कर्मचार्‍यांवर कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

Back to top button