कोल्हापूर : बनावट सोने तारण ठेवून पतसंस्था, बँकांना गंडा! | पुढारी

कोल्हापूर : बनावट सोने तारण ठेवून पतसंस्था, बँकांना गंडा!

कोल्हापूर ; सचिन टिपकुर्ले : बनावट सोने तारण ठेवून बँका, पतसंस्था व सराफ व्यावसायिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणारी टोळी कोल्हापूर मधील ग्रामीण भागात सक्रिय झाली आहे. तांब्याच्या तारेवर सोन्याचा मुलामा देऊन सराफांच्या नजरेलाही धोका देणार्‍या या बनावट आभूषणामुळे पतसंस्थांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

बँका तसेच पतसंस्थांमध्ये सोने तारण ठेवून त्यावर ठरावीक टक्के व्याज आकारणी करून कर्ज दिले जाते. गरजेपोटी अनेक लोक सोने तारण ठेवतात. सोने तारण ठेवताना सराफाकडून त्यांचे मूल्यांकन करून घेतले जाते. प्रत्येक बँका व पतसंस्थांचे मूल्यांकन करणारे सराफ हे ठरलेले असतात. त्यांच्याकडून झालेल्या मूल्यांकनानंतरच ही वित्तसंस्था सोने तारण ठेवून त्यावर कर्ज देते.

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील काही पतसंस्था सोने तारण ठेवून गेलेल्या ग्राहकांनी त्यावर व्याज न भरल्याने त्यांचा शोध घेत आहेत. मार्च अखेरमुळे काहींनी तारण सोन्याचा लिलाव करणार असल्याचेही सांगितले; पण याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले. तेव्हा तारण सोन्याची पुन्हा तपासणी केली. त्यावर प्रक्रिया केली असता काही वस्तूंवर केवळ सोन्याचा मुलामा दिल्याचे निदर्शनास आले. संबंधित वस्तूचे तुकडे केले असता आत तांब्याची तार दिसून आली. ज्यांनी वस्तू तारण ठेवली अशांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे फसवणूक करणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिस प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.

3 तोळ्यांपासून 5 तोळ्यांपर्यंत बनावट ब्रेसलेटसाठी पोकळ चेनचा वापर केला गेला आहे. 1 तोळे सोने तारण ठेवल्यानंतर 38 ते 40 हजार रुपये दिले जातात. त्यामुळे बनावट सोन्यावर अंदाजे एक ते देान लाखांचे कर्ज घेतले आहे. या कामासाठी टोळीकडून गावातील युवकांचा वापर केला जातो. त्यांना पाच ते दहा हजार रुपये देण्याचे आमिष दाखविले जाते. त्याची कोणत्या पतसंस्थेत ओळख आहे, याची खात्री करून मगच या टोळीकडून युवकाला सोन्याची वस्तू दिली जाते. रक्कम मिळाली की, ही टोळी पसार होते.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी बनावट सोने तारण ठेवून पतसंस्थांची फसवणूक झाली आहे. सराफ व्यावसायिकांनी सतर्कता बाळगून सोने चोख असल्याची शहानिशा करावी.
– अमोल ढणाल, अध्यक्ष
जिल्हा सुवर्णकार सराफ संघ

Back to top button