कोल्हापूरने जपल्या शिवछत्रपतींच्या स्मृती | पुढारी

कोल्हापूरने जपल्या शिवछत्रपतींच्या स्मृती

कोल्हापूर : सागर यादव

युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास संपूर्ण जगाला प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण केले. अशा या स्फूर्ती-प्रेरणादायी इतिहासाचा वारसा जपण्याचे आणि तो भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कोल्हापूरकरांकडून अखंड सुरू आहे. शिवछत्रपतींच्या सर्वाधिक स्मृतींचे जतन-संवर्धन कोल्हापूरकरांनीच केले आहे.

राजर्षी शाहूंचे चौफेर कार्य

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शिवछत्रपतींच्या रयतेच्या स्वराज्याचा वारसा जपत, तो विकसित करून लोककल्याणकारी राजवट राबविली. 2 एप्रिल 1894 रोजी राजर्षींनी राज्यकारभार हाती घेतल्यानंतरच्या जाहीरनाम्यात पेशवाईच्या काळात बंद पडलेले ‘शिवशक’ (शिवछत्रपतींची कालगणना) पूर्ववत सुरू केली. 31 जानेवारी 1916 रोजी शिवछत्रपतींची जयंती व स्मृतिदिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती.

छत्रपती शिवरायांची प्रेरणा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने ठिकठिकाणी शिवछत्रपतींची स्मृती स्मारके (शिवमंदिरे) उभारली. सिंधुदुर्ग किल्ल्यातील छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलेल्या शिवमंदिरासमोर सभामंडप बांधला. किल्ल्याच्या तटावर चुण्यात उमटविलेल्या शिवछत्रपतींच्या हाता-पायांच्या ठशांचे जतन-संवर्धन व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले. हाताच्या ठशावरून चांदीचा हात तयार करून तो कोल्हापुरातील जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिरात सर्वांना पाहता येईल असा ठेवला. याशिवाय पन्हाळगडावरील ताराराणी वाड्यासमोर, कोल्हापुरातील नर्सरी बागेत, जुना राजवाड्यातील कासव चौकात, टेंबलाई टेकडीवर शिवछत्रपतींची स्मारके उभारली. वन्यजीवांसाठी शिवछत्रपतींच्या नावे ‘शिवारण्य’ राखीव जंगल निर्माण केले.

दख्खनचा राजा जोतिबा यात्रेसाठी येणार्‍या लाखो भाविकांना शिवछत्रपतींचा इतिहास समजावा या उद्देशाने 1914 पासून स्वराज्य निर्माते शिवछत्रपती व स्वराज्यरक्षक रणरागिणी ताराराणी यांच्या रथोत्सवाची सुरुवात केली.19 नोव्हेंबर 1921 रोजी येथे प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते शिवस्मारकाची पायाभरणी केली. रायगडावरील शिवछत्रपतींच्या समाधी जीर्णोद्धारासाठीही पहिली मदत राजर्षी शाहू महाराज यांनीच दिली होती. शिवचरित्र लिहिणार्‍यांत कृष्णाजी केळुसकर, दत्तात्रय पारसनीस, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अशा अनेक लेखकांचा समावेश आहे.

कोल्हापुरातील विविध शिवस्मारके

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी उभारलेल्या शिवमंदिराप्रमाणेच पुढील काळात कोल्हापूरकरांनी अनेक शिवस्मारके, पुतळे उभारले. छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात टाऊन हॉल उद्यानात शिवछत्रपतींचा संगमरवरी पुतळा उभारण्यात आला.

21 सप्टेंबर 1944 रोजी कोल्हापूरच्या क्रांतिकारकांनी इंग्रज अधिकारी विल्सनचा पुतळा फोडला होता. पुढे 13 मे 1945 रोजी याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारून या चौकाला त्यांचे नाव देण्यात आले. यानंतर इसवी सन 1947 च्या दरम्यान शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात शिवछत्रपतींच्या अर्धपुतळ्याची उभारणी करण्यात आली. यानंतर 1962 ला शिवाजी विद्यापीठाची निर्मिती झाली. 1 डिसेंबर 1974 रोजी विद्यापीठाच्या भव्य वास्तूसमोर शिवछत्रपतींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाले.

विविध संस्था-संघटनांचे सर्वदूर कार्य

शिवछत्रपतींच्या स्फूर्तिदायी इतिहासाचे जतन-संवर्धन-संरक्षण व्हावे, तो नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने विविध शिवभक्त-इतिहासप्रेमी संस्था -संघटना सातत्याने सक्रिय असतात. शिवछत्रपतींच्या इतिहासासंदर्भातील विविध वस्तूंची प्रदर्शने, व्याख्याने, अभ्यासवर्ग, दुर्ग भ्रमंती, गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहीम यासह शिवजयंती सोहळा, शिवपुण्यतिथी आणि शिवकालीन घटनांच्या स्मृती जपणारे उपक्रम आयोजित केले जातात.

यात शिवजयंती (19 फेब्रुवारी), शिवप्रतापदिन (10 नोव्हेंबर), शिवराज्याभिषेक सोहळा (6 जून), पावनखिंड संग्रामदिन (13 जुलै), शिवपदस्पर्शदिन (27 नोव्हेंबर) अशा दिवसांचा समावेश असतो. शिवकालीन युद्धकलेचे जतन-संवर्धन करून ते विकसित करण्याचेही महत्त्वपूर्ण कार्य कोल्हापूरकरांनी केले आहे.

Back to top button