कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यू चा विळगा घट्ट, नागरिक हैराण | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यू चा विळगा घट्ट, नागरिक हैराण

जिल्ह्यातील नागरिक डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया तापाने हैराण झाले आहेत. गेल्या सात महिन्यांत जिल्ह्यात डेंग्यू चे 131, मलेरिया 1 तर चिकुनगुनियाचे 62 बाधित रुग्णांची तर डेंग्यमुळे तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा हिवताप अधिकारी दप्तरात झाली आहे. कोल्हापूर शहरातही डेंग्यूने अक्षरशः थैमान घातले आहे. कुठेही औषध फवारणी होत नसल्याने दिवसेंदिवस डेंग्यूचे रुग्ण वाढतच आहेत.

महापालिका यंत्रणा सुस्त आणि डेंग्यूचे डास फास्ट अशी अवस्था बनली आहे. शहरवासीयांच्या आरोग्याशी महापालिका प्रशासन खेळत असल्यासारखी स्थिती आहे. कोरोनापेक्षा चिंताजनक अवस्था डेंग्यू व चिकुनगुनियासदृश तापाने झाली आहे. सद्यस्थितीत बुधवारी शहरात कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण 1382 होते. परंतु, डेंग्यूचे रुग्ण सुमारे पाच हजारांवर आहेत. गल्लोगल्ली डासांचे साम्राज्य निर्माण होत असल्याने शहराला डेंग्यूचा विळखा पडत आहे. डेंग्यूने शहरवासीयांचे बळी जायला लागल्यावरच झोपलेल्या महापालिका प्रशासनाला जाग येणार का? उसा उद्विग्न सवाल उपस्थित केला जात आहे.

कोल्हापूर ः सतीश सरीकर : शहरातील बहुतांश भागात तापाने अनेक रुग्ण फणफणत आहेत. अक्षरशः डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापासून तीव— अंगदुखी जाणवत आहे. जीव नकोसा करणार्‍या अंगदुखीने रुग्ण वैतागले आहेत. अशक्तपणाने धड उभारताही येत नसल्याचे वास्तव आहे. प्रत्येकजणच रक्त तपासणी करतो असे नाही. कोरोनाच्या तपासण्या निगेटिव्ह आल्यानंतरही ताप उतरत नसल्याने मग डेंग्यूच्या टेस्टसाठी पुन्हा खर्च करावा लागत आहे. चिकुनगुनिया सद़ृश तापाचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. परंतु, महापालिका यंत्रणेला त्याचा थांगपत्ताही लागत नाही. एकूणच महापालिकेची यंत्रणा कुचकामी ठरत आहे. शहरात कुठेही सर्वेक्षण अथवा औषध फवारणी होताना दिसत नाही. जनजागृती केली जात नाही.

एक कोटीचे ट्रॅक्टर पाण्यात…

गेल्यावर्षी महापालिका प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औषध फवारणीसाठी खास बाब म्हणून तब्बल एक कोटीचे दहा ट्रॅक्टर खरेदी केली. कोरोनाच्या पहिल्या लाटेपुरताच त्याचा वापर झाला. त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या कारभाराप्रमाणे ते ट्रॅक्टर आता वर्कशॉपमध्ये धूळखात पडले आहेत. दहापैकी फक्त दोन ट्रॅक्टर रस्त्यावर धावत आहेत; पण त्यांचीही अवस्था औषध फवारणी करताना ट्रॅक्टर दाखवा अन् बक्षीस मिळवा… अशी झाली आहे. परिणामी, एक कोटीचे ट्रॅक्टर पाण्यात गेल्याची अवस्था झाली आहे.

आरोग्याधिकारी पद रिक्त…

शहरात कोरोनाने कहर केला आहे. त्यातच आता डेंग्यूने धुमाकूळ घातला आहे. तरीही महापालिका प्रशासनाला त्याचे काहीही देणे-घेणे नसल्याची स्थिती आहे. शहरातील खासगी दवाखाने रुग्णांनी रोज फुल्ल भरलेले असतात. शहरातील आरोग्यविषयक बाबी गंभीर बनल्या असल्या तरी महापालिका प्रशासनाला त्याचे काहीही देणे-घेणे नाही. कारण महापालिकेतील आरोग्याधिकारी पद रिक्त आहे. गेल्या दोन महिन्यांत चार वैद्यकीय अधिकार्‍यांकडे आरोग्यधिकारीपदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला आहे.

महापालिकेची यंत्रणा
छोटे ट्रॅक्टर 10
धूर फवारणी मशिन 30
बॅटरीवरील हँडपंप 100
फवारणीसाठी कर्मचारी 60

डेंग्यूची लक्षणे

डेंग्यू ताप – एकाएकी तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायुदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, दुसर्‍या दिवसापासून तीव्र डोळेदुखी, अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे व तोंडाला कोरड पडणे, ताप कमी-जास्त होणे, अंगावर पुरळ येणे.
रक्तस्त्रावयुक्त डेंग्यू ताप – त्वचेखाली रक्तस्त्राव, नाकाकडून रक्तस्त्राव, रक्ताची उलटी, रक्तमिश्रित किंवा काळसर रंगाचे शौचास होणे, पोट दुखणे.

पहिल्या दिवशी ताप, कणकण, थंडी वाजून येणे असे रुग्ण 40 ते 50 येतात. दुसर्‍या दिवशी त्यांचे अंग लाल होते. खाज सुटते. प्रचंग अंगदुखी होते. सांधेदुखी होते. रोज साधारण 4 ते 5 डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. त्याबरोबरच इतरही रुग्णांत चिकुनगुनियासदृश तापाची लक्षणे आढळत आहेत. एकूणच डेंग्यू व चिकुनगुनिया रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.
– डॉ. सुनील सावंत

डेंग्यू हा आजार विषाणूमुळे (अर्बो व्हायरस) होतो

एडीस इजिप्ती डासापासून डेंग्यू डासाचा प्रसार

डासाच्या पायावर पांढरे चट्टे असतात म्हणून त्याला टायगर मॉस्कुटो म्हणतात. हे डास दिवसा चावतात

डेंग्यू तापाचा लागण काळ तीन ते दहा दिवसांचा आहे

डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे

साठवलेले स्वच्छ पाणी उदा. पाण्याची टाकी, रांजण, वॉटर कुलरमधील पाणी, भंगार वस्तू उदा. नारळाच्या करवंट्या, टायर, डबे, रिकाम्या कुंड्या, बादल्या, बांधकामावरील पाण्याचे उघडे साठे.

कोल्हापुरात डासांची दहशत…

कोल्हापूर शहरात कुठेच औषध फवारणी होत नसल्याने डासांची दहशत निर्माण झाली आहे. अगोदर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुणी शिंकले किंवा खोकले तरी नागरिक संबंधिताकडे पाहून लांब जात असत. आता डास चावू नये म्हणून नागरिक एकतर डासापासून पळून जाण्यासाठी किंवा त्याला मारण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. कारण डासांचा चावा हा डेंग्यूंचा डंख ठरू शकतो. शहरात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालेला आहे. तरीही महापालिकेला त्याचे काहीही सोयरसूतक नसल्याचे वास्तव आहे. प्रशासनाला शहरवासीयांच्या आरोग्याची किती काळजी आहे ते यावरून स्पष्ट होते.

Back to top button