KMT Kolhapur : केएमटी फायद्याच्या मार्गावर धावणार कधी? | पुढारी

KMT Kolhapur : केएमटी फायद्याच्या मार्गावर धावणार कधी?

कोल्हापूर ; सतीश सरीकर : प्रवाशांची गर्दी असते तेथे बस नसते. बस असते तेथे प्रवासी नसतात. प्रवाशांच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार बसेसचे वेळापत्रक नाही. 129 पैकी फक्त 60 बसेस रस्त्यावर धावत आहेत. कर्मचार्‍यांचे पगार वेळेवर होत नाहीत. 65 बसेस वर्कशॉपमध्ये पडून आहेत, यांसह विविध समस्यांतून केएमटी धावत आहे. प्रवाशांच्या गरजेनुसार शंभरावर बसेस विविध मार्गावर सोडणे, परिणामी उत्पन्नवाढीतून आर्थिकद़ृष्ट्या सक्षम करणे आणि सुस्थितीत आणण्यासाठी केएमटीला वळण लावण्याचे आव्हान नूतन अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक मंगेश गुरव यांच्यासमोर आहे. (KMT Kolhapur)

दोन वर्षापूर्वी केएमटीच्या तब्बल 100 ते 110 बसेस कोल्हापूर शहर आणि परिसरात धावत होत्या. रोजचे उत्पन्न सुमारे 10 लाखांच्यावर होते. परंतु गेल्या काही वर्षांतील डिझेल दरवाढ आणि बसेसच्या मेंटेनन्समुळे केएमटी कोलमडली आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष आणि काही कर्मचार्‍यांचा कामचुकारपणाही त्याला तितकाच कारणीभूत आहे. वेळेवर पगार होत नसल्यानेही काही कर्मचारी इतर व्यवसाय करून बदली म्हणून केएमटीकडे कार्यरत आहेत. परिणामी त्यांना पगाराची शाश्वती देणे आवश्यक आहे.

केएमटीत सद्य:स्थितीत 450 कायम कर्मचारी आहेत. त्याबरोबरच बदली कर्मचारी 200 व कंत्राटी कर्मचारी 100 आहेत. त्यांच्या पगारासाठी महिन्याला सुमारे 1 कोटी 60 लाख लागतात. तेवढी रक्कमही केएमटीकडे जमा होऊ शकत नाही. परिणामी महापालिकेच्या अनुदानावर केएमटी कर्मचार्‍यांचा पगार अवलंबून असतो. काहीवेळा महापालिकेतून रक्कम मिळाल्यानंतरच कर्मचार्‍यांचा पगार केला जातो. विशेष म्हणजे तब्बल केएमटीतील 450 पदे रिक्त आहेत.

केएमटीच्या ताफ्यात 129 बसेस आहेत. गेल्या दीड वर्षात कोविड, लॉकडाऊन यामुळे केएमटीची सेवा ठप्प झाली होती. कालातंराने हळूहळू केएमटी पूर्ववत रस्त्यावर धावू लागली. दोन बसेसनंतर आता केएमटीच्या 60 बसेस रोज विविध मार्गावरून धावत आहेत. शाळा-कॉलेज सुरू झाल्याने आणि शासकीय कार्यालयेही पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने केएमटीला (KMT Kolhapur) मागणी वाढली आहे. प्रवाशांची गर्दी होत आहे. परंतु त्या तुलनेत बसेसची संख्या अपुरी पडत आहे. परिणामी प्रवासीवर्ग वडापलाही प्राधान्य देत आहेत. त्यामुळे वडापने केएमटीला समांतर यंत्रणा उभी केल्याचे वास्तव आहे. कर्मचार्‍यांना आलेली मरगळ झटकून धडाकेबाज काम केल्यास निश्चितच केएमटीचे मार्गक्रमण ऊर्जितावस्थेकडे होईल.

केएमटीतून गेल्या चार वर्षात 180 कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या ग्रॅच्युईटीची रक्कम व रजेचा पगारही प्रशासनाने दिलेला नाही. 2017 पासून तब्बल पाच कोटीच्यावर रक्कम थकीत आहे. सेवानिवृत्त कर्मचार्यांना औषधोपचारासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा इतर कारणासाठी रक्कम हवी असूनही मिळत नसल्याने तीव— संताप व्यक्त केला जात आहे. अनेकवेळा सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी आंदोलनेही केली आहेत. परिणामी त्यांच्या हातात रक्कम मिळालेली नाही.

Back to top button