कोल्हापूर ; शाळा उद्यापासून | पुढारी

कोल्हापूर ; शाळा उद्यापासून

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर बंद असलेल्या जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनांच्या 3 हजार 715 शाळांची घंटा मंगळवारपासून पुन्हा वाजणार आहे. यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पहिली ते बारावीच्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये दि. 25 जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शासकीय 9, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक 1,981, नगरपालिकेच्या 130, खासगी अनुदानित 996, खासगी विनाअनुदानित 599 शाळा सुरू होणार आहेत. यात पहिली ते बारावीपर्यंतची 6 लाख 76 हजार 261 विद्यार्थीसंख्या आहे. या शाळांमध्ये 24 हजार 938 शिक्षक कार्यरत आहेत.

प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषद सीईओ यांनी रविवारी शिक्षण व आरोग्य विभागाची ऑनलाईन बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.

दोन डोस पूर्ण झालेले, कोरोनाची लक्षणे नाहीत असे शिक्षक व कर्मचारी शाळेत उपस्थित राहणार आहेत. कोरोनाची लक्षणे असणार्‍या प्रत्येकाने स्वत:ची आरटी-पीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. एक टक्के लोकसंख्या किंवा शंभरपैकी कमी कोरोना रुग्ण असणार्‍या गावांतील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये शाळा व्यवस्थापन, पालक-शिक्षक समित्यांनी तत्काळ बैठक घेऊन सुरू करण्याचा निर्णय घ्यावा. प्रत्येक वर्गात 50 टक्के विद्यार्थी एक दिवस आड बोलवावेत.

शाळा वर्गखोल्यांच्या उपलब्धतेप्रमाणे दोन सत्रांत भरवावी. गाव, शहर कंटेन्मेंट झोनमधील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद राहतील. या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देऊ नये. 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण 10 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी आदेशात दिल्या आहेत.

शाळांसाठी मार्गदर्शक सूचना

* एखादा विद्यार्थी बाधित आढळल्यास पूर्ण वर्ग तातडीने बंद करणे
* शाळांमध्ये कोव्हिड-19 विषयक आवश्यक सर्व स्वच्छता व सुरक्षा, मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन आवश्यक
* शाळा नजीकच्या महापालिका किंवा खासगी आरोग्य केंद्राशी संलग्‍नित करून घेणे आवश्यक
* एका बाकावर एकच विद्यार्थी
* जे विद्यार्थी ऑफलाईन वर्गासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत त्यांना ऑनलाईन शिकवणी द्यावी
* शिक्षकमित्र, पालकमित्र, गृहभेटी अशा माध्यमातून शिक्षण सुरू ठेवणे आवश्यक
* लसीकरणाबाबतही जनजागृती व नियोजन करणे
* शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहावे

Back to top button