रत्नागिरी : खून प्रकरणातील फरार कैद्याला दोन वर्षांची सक्तमजुरी | पुढारी

रत्नागिरी : खून प्रकरणातील फरार कैद्याला दोन वर्षांची सक्तमजुरी

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : खून प्रकरणात कोल्हापूर येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना संचित रजेचा गैरफायदा उठवत फरार झालेल्या आरोपीला न्यायालयाने दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. मुईन मोहम्मद युसुफ काझी उर्फ मोईन उर्फ रॉनी बिझा उर्फ हेमंत शहा ( 33, रा. कुवारबाव, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोल्हापूर कारागृहातून संचित रजेवर बाहेर पडल्यानंतर ती संपल्यानंतर तो पुन्हा कारागृहात हजर न होता फरार झाला होता. कोल्हापूर पोलिसांकडून रत्नागिरी शहर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पुन्हा पकडले.

कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला मोईन हा फरार झाल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. मोईन याने आपला गुन्हा न्यायालयापुढे कबुल केला. रत्नागिरी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव यांनी या खटल्याचा निकाल दिला.
त्यानुसार, मोईन काझीने तालुक्यातील पोमेंडी-बुद्रूक येथे शहरातील शिवाजीनगर भागात राहणार्‍या अभिजित शिवाजी पाटणकर या तरुणाचा तीन गोळ्या झाडून निर्घृण खून केल्याचा आरोप होता. या आरोपाखाली सत्र न्यायालयाकडून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानुसार मोईन काझी हा कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे शिक्षा भोगत होता.

कोल्हापूर कारागृह प्रशासनाकडून मोईन याला ८ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ अशी २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली होती. त्यानुसार मोईन काझी हा कारागृहातून बाहेर पडला होता. ५ ऑगस्ट २०२३ रोजी तो पुन्हा कारागृहात हजर होणे अपेक्षीत असताना हजर न होता तो फरार झाला होता. या प्रकरणी मोईन काझी विरुध्द भादंवी कायदा कलम २२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. अखेर पोलिसांकडून मोईनला ताब्यात घेऊन न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी मोईन काझी याने आपला गुन्हा कबूल केला. न्यायालयाने त्याला दोन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

हेही वाचा :

Back to top button