समुद्र शेवाळापासून बनतेय चॉकलेट, जेली, आइस्क्रीम | पुढारी

समुद्र शेवाळापासून बनतेय चॉकलेट, जेली, आइस्क्रीम

रत्नागिरी : जान्हवी पाटील : चॉकलेट, आइस्क्रीम, जेली, कॉस्मेटिक या सारख्या उत्पादनांत समुद्र शेवाळापासून बनलेले कॅराग्रीन हे केमिकल वापरले जाते. खेड येथील लोटे एमआयडीसीतील कंपनीत शेवाळावर प्रक्रिया केली जाते. या ठिकाणी शेवाळावर अधिक संशोधन देखील सुरू आहे.

रत्नागिरी जिल्हा आर्थिक विकास महामंडळामार्फत तीन वर्षांपासून समुद्र शेवाळ शेती प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यातून २०० महिलांना रोजगारही प्राप्त झाला आहे.

समुद्रातून खूप मोठा नैसर्गिक खजिना मिळतो, हे सर्वज्ञात आहे. मात्र, समुद्रातील शेवाळापासून आश्चर्यचकित करणारी उत्पादने बनविली जातात. रत्नागिरीतील जयगड, वरवडे आणि नेवरे येथे समुद्र शेवाळ शेती प्रकल्प सुरू आहेत. शेवाळापासून बनविलेल्या कॅराग्रीन या केमिकलचा चॉकलेट, कॉस्मेटिक, जाम उत्पादन, सॉस यामध्ये समावेश असतो. हे केमिकल बनविल्यानंतर खराब झालेले शेवाळ सुकवून त्यापासून औषधे, फवारणी केमिकल आणि त्याची पावडर बनविली जाते त्यामुळे शेवाळ उत्पादन वाया जात नाही. लोटेतील एक्सल कंपनीत संशोधन सुरू आहे. चकाकी हा शेवाळचा गुणधर्म आहे. या चकाकीपासून जेलीसारखा प्रकार तयार होतो.

शेवाळ तयार होण्यासाठी

४५ दिवसांचा कालावधी ज्या भागांत मासेमारी होत नाही, अशा भागांत ५ ते १५ फूट खोलीवर ही शेवाळ शेती केली जाते. हे शेवाळ तयार होण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी लागतो. या शेतीसाठी स्थानिक महिलांना रीतसर महिला आर्थिक विकास महामंडळाकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे.

तामिळनाडूतील मंडपम या ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या गावातून शेतीसाठी शेवाळ मागवले जाते. येथे समुद्रात बांबूचे तराफे लावून शेती करतात.

– अंबरीश मेस्त्री, जिल्हा समन्वयक, आर्थिक विकास महामंडळ

Back to top button