Sindhudurg News : कुडाळ येथे ‘भारत संकल्प यात्रे’वरून मविआ – भाजप आमनेसामने | पुढारी

Sindhudurg News : कुडाळ येथे 'भारत संकल्प यात्रे'वरून मविआ - भाजप आमनेसामने

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : कुडाळ नगरपंचायत येथे नियोजित विकसित भारत संकल्प यात्रेला सत्ताधारी महाविकास आघाडी गटाच्या नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यात्रेतील गाडीवर असलेल्या ‘मोदी सरकार’ या शब्दाला आक्षेप घेत आज (दि.२९) तीव्र विरोध केला. याला तोडीस तोड प्रत्युत्तर देत विरोधी भाजपच्या नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोदी सरकार समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. Sindhudurg News

यावेळी दोन्ही गटात झटापट झाली. यावेळी दोन्ही गटांना काबुत आणताना पोलिस व दंगल नियंत्रक पथक पुरते हतबल झाले. या गोंधळातच भाजप गटाकडुन यात्रेचे उद्घाटन करून गाडीत बसविलेल्या स्क्रीनवरील योजनांची माहिती देण्यात आली.
तब्बल एक तासाहून अधिक वेळ दोन्ही गटाकडून हा गोंधळ सुरूच होता. अखेर या गोंधळातच भाजप नगरसेवक व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुख्याधिकार्‍यांना बोलावून घेत उपक्रमांची माहिती नागरिकांना सांगण्यास भाग पाडले. त्यानंतर हात पुढे करत शपथ घेतली. मात्र सत्ताधारी गटाकडून या उपक्रमाचा निषेध करण्यात आला. Sindhudurg News

सत्ताधारी गटाच्या नगराध्यक्षा अक्षता खटावकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक तथा गटनेते मंदार शिरसाट, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका सई काळप, नगरसेविका श्रेया गवंडे, अतुल बंगे आदीनी पुढे येत या यात्रेचे आम्ही स्वागत करतो. मात्र, यात्रेतील रथावर मोदी सरकार उल्लेख आहे. त्याला आमचा आक्षेप असल्याचे सांगत विरोध केला. यावेळी पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला यांनी सत्ताधारी गटाला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्ताधारी गट आपल्या भूमिकेवर ठाम राहिला.

त्यामुळे काहीसा गोंधळ सुरू झाला. याच दरम्यान भाजपा गटाच्या नगरसेविका . संध्या तेरसे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करत कार्यक्रम सुरू केला. त्यामुळे सत्ताधारी गटाचे नगरसेवक आक्रमक झाले. नगरपंचायतचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष असताना उद्घाटनाचा मान विरोधकांना का दिला? असा प्रश्न यावेळी सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी अरविंद नातू यांना केला. यावेळी पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला यांनाही सत्ताधारी गटाने खडेबोल सुनावले.

कार्यक्रम सुरू होताच भाजप नगरसेवक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोदी सरकार समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी दिली. त्याला प्रत्युत्तर म्हणुन महाविकास आघाडीकडूनही मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे या ठिकाणचे वातावरण चांगले तापले.

Sindhudurg News  गोंधळात लाभार्थ्याचे हाल

यावेळी विविध योजनांचे स्टॉल कुडाळ नगर पंचायतीच्या प्रांगणात लावण्यात आले होते. मात्र, दोन्ही गटाकडुन जोरदार घोषणा आरोप- प्रत्यारोप झाल्यामुळे संपुर्ण कार्यक्रम गोंधळातच पार पडला.

मोदी सरकारच्या नावाला विरोध – खटावकर

भारत संकल्प यात्रेच्या गाडीवर भारत सरकार असे नाव नाही. मोदी सरकार असे नाव असल्यामुळे आमचा या यात्रेला विरोध आहे. या यात्रेत भारताचा तिरंगा सुध्दा नाही. उद्घाटनाचा मान दिला नाही. याचा मी निषेध करत आहे,असे नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांनी सांगितले.

Sindhudurg News  अडवणूक करणार्‍यांची पोलिसांत फिर्याद – नातू

कार्यक्रमाची अडवणूक करण्याचा प्रयत्न झाला. त्या विरोधात पोलिसांत योग्य ती फिर्याद आम्ही देणार असल्याची माहिती कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी दिली.

..ही तर भाजपची हिटलरशाही – शिरसाट

हिटलरशाही राबवून भाजपने ही रथयात्रा सुरू ठेवली. भारत सरकारची यात्रा असुनही या यात्रेला मोदी सरकारचे नाव देवून हजारो कोटी रूपये खर्च का करतात? पोलिसांनी पूर्णतः दडपशाही केली. भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे पोलिस वागले, असा आरोप नगरसेवक तथा गटनेते मंदार शिरसाट यांनी केला.

प्रशासन कुचकामी – सावंत

भाजपच्या रथयात्रेला अज्ञान बुध्दीने विरोध झाला आहे. प्रशासनाने योग्य पध्दतीने हा विषय हाताळला नाही. दबावाला बळी पडून प्रशासनाने या कार्यक्रमाचा विचका केला. याबाबतची कल्पना पालकमंत्री रविंद्र चव्हाण व केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना दिली. आता मुख्याधिकारी यांनी अडथळा आणणार्‍यांविरोधात फिर्याद द्यावी. त्यांनी आपली भूमिका चोख न बजावल्यास त्यांच्याविरोधात हक्कभंग आणू, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिला.

हेही वाचा 

Back to top button