शिष्यवृत्तीच्या रकमेत घसघशीत वाढ | पुढारी

शिष्यवृत्तीच्या रकमेत घसघशीत वाढ

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने उच्च प्राथमिक शाळा शिषवृत्ती (इयत्ता पाचवी) आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) साठी पात्र असणार्‍या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता पाचवीच्या विद्यार्थ्यांना महिन्याला 500 याप्रमाणे दहा महिन्यासाठी 5 हजार तर आठवीच्या विद्यार्थ्यांना महिन्याला 750 याप्रमाणे दहा महिन्यांसाठी 7 हजार 500 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.

पाचवीच्या विद्यार्थ्यांना पात्र ठरल्यानंतर सलग तीन वर्षे तर आठवीच्या विद्यार्थ्यांना सलग दोन वर्षे शिष्यवृत्ती देण्यात येते. राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहित करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येते. राज्यातील शिष्यवृत्तीच्या परीक्षेला विशिष्ट शैक्षणिक दर्जा आहे. शिष्यवृत्ती मिळवणे ही विद्यार्थ्यांसाठी प्रतिष्ठेची बाब मानली जाते. राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अधिकाअधिक प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने 1954 पासून राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.

यापूर्वी राज्यातील पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रति महिना 100 रुपये या प्रमाणे दहा महिन्यांसाठी एक हजार आणि तीन वर्षांसाठी 3 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत होती. आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रति महिना 150 रुपयेप्रमाणे दहा महिन्यांसाठी 1 हजार 500 रुपये आणि दोन
वर्षांसाठी 13 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत होती. आता या रकमेत वाढ करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीच्या रकमेत घसघशीत वाढ झाल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार
असल्याचा विश्वार्स शिक्षण विभागाला आहे.

Back to top button