रत्नागिरी : परशुराम घाटातील भेगांची तातडीने डागडुजी | पुढारी

रत्नागिरी : परशुराम घाटातील भेगांची तातडीने डागडुजी

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा :  मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात भरावावर केलेल्या काँक्रिटीकरणाला भेगा पडल्या आहेत. याची तत्काळ दखल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली असून संबंधित ठेकेदार कंपनीला तत्काळ डागडुजी करण्याचे आदेश दिल्यानंतर मंगळवारी हे काम सुरू झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहतुकीसाठी कोणताही अडथळा येणार नाही व कोणताही धोका नाही असे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे म्हणणे आहे.

परशुराम घाटातील एक लेनचे काम पूर्ण झाल्यानंतर या लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, पहिल्याच पावसात दरडीच्या बाजूने असलेले काँक्रीटीकरणला सुमारे दीडशे मीटरच्या आसपास भेगा पडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या बाबत राष्ट्रीय महामार्ग विभागावर धडक दिली होती. यानंतर याची गंभीर दखल सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली असून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांना तत्काळ डागडुजी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार काँक्रीटीकरणाला पडलेल्या भेगा सिमेंटने भरण्यात येत आहेत.

तसेच पावसाळ्यानंतर दरडीच्या बाजूची लेन पूर्ण झाल्यावर त्या मार्गावर वाहतूक वळवून हे काँक्रिटीकरण नव्याने करण्यात येईल असेही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान या मार्गावरून वाहतूक सुरू ठेवण्यास कोणताही धोका नाही. मात्र, दरडप्रवण क्षेत्रात वाहने सावकाश चालवावीत असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या बाबत परशुराम घाटात वाहने सावकाश चालवावीत, असे फलक लावण्यात आले आहेत.

Back to top button